गोंदिया : कोरोनाच्या संसर्गात पुन्हा वाढ झाल्याने याला प्रतिबंध लावण्यासाठी कोरोना लसीकरणाला गती देण्याचे निर्देश केंद्र आणि राज्य सरकारने दिले आहेत. त्याच अनुषंगाने आरोग्य विभागाने जिल्ह्यात लसीकरण केंद्रात वाढ केली आहे. शनिवारपासून (दि.२७) एकूण १०३ लसीकरण केंद्रांवरून लसीकरणास सुरुवात करण्यात आली. मात्र, यासाठी डॉटा एन्ट्री ऑपरेटरची कमतरता असल्याने ती पंचायत विभागाकडून उधारीवर घेण्यात आल्याची माहिती आहे.
कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत ६५ हजार नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. तर १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. जिल्ह्यात ४५ वर्षांवरील ५ लाख ५० हजार नागरिक आहेत. त्यामुळे यांना लसीकरण करण्यासाठी केंद्राची संख्या वाढविण्याची गरज असून त्यासाठी मनुष्यबळसुद्धा लागणार आहे. त्यासाठीच जिल्हा आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रासह आता ३९ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये सुद्धा शनिवारपासून सुरुवात केली. पहिल्याच दिवशी जवळपास ४ हजारांवर नागरिकांना लसीकरण करण्यात आले. आरोग्य विभागाने दररोज ५ हजारांवर नागरिकांना कोरोना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या दृष्टीने नियोजन सुरू केले आहे; पण यासाठी महत्त्वपूर्ण असणारे डॉटा एन्ट्री ऑपरेटरची कमतरता असल्याने ही कमतरता दूर करण्यासाठी सध्या ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत डॉटा एन्ट्री ऑपरेटरची मदत घेतली जात आहे.
.......
डॉटा एन्ट्री ऑपरेटर तीन महिन्यांपासून वेतनापासून वंचित
जानेवारी महिन्यापासून कोविड लसीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यासाठी कंत्राटी तत्त्वावर डॉटा एन्ट्री ऑपरेटर घेण्यात आले. मात्र, डॉटा एन्ट्री ऑपरेटर आणि परिचारिकांना मागील तीन महिन्यांपासून वेतन देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांना विविध आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता येत्या आठ दिवसांत वेतनाची समस्या मार्गी लावणार असल्याचे सांगितले.
...........