गोंदिया : वैनंगगा नदीवर आंघोळीसाठी गेलेले तीन युवक नदीत बुडल्याची घटना मंगळवारी (दि.१२) सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास लगतच्या बालाघाट जिल्ह्यातील रामपायली तालुक्यात घडली. मंगळवारी अंधारामुळे बुडालेला युवकांची शोध मोहीम राबविता आली नाही. त्यामुळे बुधवारी (दि.१३) सकाळपासून वैनगंगा नदीत पोलिस व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मदतीने शोध मोहीम राबविण्यात आली. दुपारपर्यंत दोन युवकांचे मृतदेह सापडले तर एका युवकाचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरु होती.
मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील वारासिवनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहित महेश बुर्डे (२०) रा. बेनी जिल्हा बालाघाट, अखिल चमनलाल बुर्डे (२१) रा. बेनी जिल्हा बालाघाट आणि राकेश नंदनवार रा.तुमसर जि. भंडारा असे वैनगंगा नदीत बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अखिलचे वडील चमनलाल बुर्डे यांच्यासह महेश, अखिल आणि राकेश हे तिघेही तरुण रामपायली तालुक्यातील वैनगंगा नदीत आंघोळीसाठी गेले होते. त्यांच्यासोबत अखिलचे वडील चमनलाल बुर्डे देखील नदीकाठी उपस्थित होते. अचानक आंघोळ करीत असताना, तिन्ही तरुण नदीच्या खोल पाण्यात गेले आणि बुडू लागले. हे पाहून अखिलचे वडील चमनलाल यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना तिन्ही तरुणांपैकी कोणालाही वाचविता आले नाही. ते तिघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. या घटनेची बातमी गावात पसरली. त्यामुळे गावकऱ्यांचा जमाव नदीकाठी जमला. या घटनेमुळे तरुणांच्या कुटुंबावर शोककळा पसरली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बालाघाट जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन पथकाला बुडालेल्या तीनही तरुणाबद्दल माहिती दिली आणि यांच्या शोध घेण्याकरिता सांगितले. पण परंतु मंगळवारी सायंकाळी उशीर झाला असल्याने तरुणांचा शोध लागला नाही. बुधवारी सकाळपासून तरुणांचा शोध घेण्याला सुरुवात केली असता मोहित महेश बुर्डे आणि अखिल चमनलाल बुर्डे या दोघांचे मृतदेह दुपारपर्यंत आपत्ती व्यवस्थापन पथकाने शोधून काढले. पण भंडारा जिल्ह्यातील राकेश नंदनवार याचा अद्यापही शोध लागलेला नाही.
भुजली उत्सवाकरिता गेला होता राकेशबालाघाट जिल्ह्यात रक्षाबंधननंतर भुजली उत्सव साजरा केला जातो. त्याकरिता राकेश नंदनवार हे भंडारा जिल्ह्यातून बालाघाट जिल्ह्यात पाहुणे म्हणून नातेवाईकाकडे आले होते. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास तिघेही तरुण चमनलाल बुर्डे यांच्यासोबत आंघोळीकरिता वैनगंगा नदीच्या पात्रात गेलेले होते. दरम्यान आंघोळी करिता केले असता तिघेही वैनगंगा नदीत बुडाले होते.