गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्रीकरणाचा अद्याप कुठलाच प्रस्ताव आलेला नाही. याची केवळ माध्यमातच चर्चा आहे, तसेच यावर मी व्यक्तिगत माझे विचार मांडणे योग्य नाही. आम्ही पक्षातील सर्व प्रमुख मंडळी चर्चा करू. त्या चर्चेत काही निघाले, तरच त्यावर काही बोलणे योग्य होईल. त्यापूर्वी यावर काहीही बोलण्याची गरज नसल्याचे खा. प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.
खा. प्रफुल्ल पटेल हे रविवारी (दि.११) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. उद्धव सेनेचे खा. संजय राऊत यांनी केंद्र सरकारने युद्धापासून माघार का घेतली आणि सिजफायर का स्वीकारले, असा सवाल उपस्थित केला. यावर खा. प्रफुल्ल पटेल म्हणाले, अशा चिल्लर माणसाच्या सगळ्या गोष्टींची एवढ्या मोठ्या भारत- पाकिस्तानच्या युद्धामध्ये आपण कितपत नोंद घ्यावी, ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्या माणसाला आंतरराष्ट्रीय राजकारणातील ‘अ’सुद्धा कळत नाही, आपल्या देशाचा फायदा कुठल्या बाबतीत आहे, हे ज्यांना माहीत नसेल, अशा चिल्लर राजकारण करणाऱ्याच्या बाष्कळ बडबडीला उत्तर देणे योग्य वाटत नसल्याचे खा. पटेल म्हणाले.
आमची लढाई ही दहशतवादाविरुद्ध
भारत आणि पाकिस्तान यांच्यात अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धविराम शनिवारी सायंकाळी ०५:०० वाजता जाहीर करण्यात आला. पण त्यानंतरही रात्री ०८:०० वाजेच्या सुमारास पाकिस्तानी सेनेकडून जम्मू, पठाणकोट, जैसलमेर, अमृतसर ते भुजपर्यंत अनेक ड्रोन हल्ले भारतीय सीमेवर करण्यात आले; पण भारतीय सेनेने आपले शौर्य दाखवून ते ड्रोनहल्ले आपल्या जमिनीवर पडण्याआधीच निकामी केले. पाकिस्तानने खऱ्या अर्थाने युद्धविराम करायचा असेल, तर हे थांबवायला पाहिजे, शनिवारी रात्री असा सूचक इशारा आपले परराष्ट्र सचिव यांनी दिला आहे. या युद्धात भारताची पहिल्या दिवसापासून अतिशय स्पष्ट भूमिका होती की, आमची लढाई ही पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांसोबत नाही, तर आमची लढाई ही दहशतवादाविरुद्ध आहे. भारताला पहलगाम हल्ल्याला उत्तर देणे गरजेचे होते, असे खा. पटेल म्हणाले.