लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार आता सरकारने विद्यालयात एसटीचे पास देण्याची व्यवस्था केल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापुढे एसटी प्रवासाचे पास मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना एसटी डेपोत जाऊन लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. आता हे पास थेट शिक्षण संस्थांमधूनच देण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि श्रमाची बचत होणार आहे.
शाळा-कनिष्ठ महाविद्यालये आणि महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळ विविध प्रकारचे मासिक, त्रैमासिक आणि अर्धवार्षिक पास देते. आतापर्यंत हे पास एसटी डेपोत जाऊन मिळवावे लागत होते. नवीन योजनेनुसार शाळा-महाविद्यालयांमार्फतच सामूहिक अर्ज करून विद्यार्थ्यांना वर्गातच हे पास वितरित करण्यात येत आहेत.
पूर्वी हजारो विद्यार्थी एसटी डेपोमध्ये पास मिळवण्यासाठी दिवसभर रांगेत उभे राहत असतं. कधी-कधी दोन-तीन दिवस प्रयत्न करावे लागत. त्यामुळे शाळेच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना पास मिळवण्यासाठी गैरहजर राहावे लागत होते. मात्र, आता विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार आहे, तसेच शाळेपासून डेपोपर्यंतचा त्रास टळणार आहे. शाळेतच पासचे वितरण होत असल्याने सर्वांना वेळेत पास उपलब्ध होणार आहे.
एसटीमुळे लाखो विद्यार्थ्यांची वाट सोपीशिकण्यासाठी घरून निघून पुढे एसटीने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी पास मिळतो. या नव्या उपक्रमामुळे त्यांचा शिक्षणाकडे ओढा वाढणार आहे. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाचे पास एसटी डेपोत जाऊन मिळवावे लागत होते. नवीन योजनेनुसार विद्यार्थ्यांना वर्गातच हे पास मिळत आहेत.
"प्रत्येक शाळा-महाविद्यालय आपल्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करून एसटी विभागाला एकत्रित स्वरूपात अर्ज सादर करीत आहेत. गोंदियात एसटी महामंडळाचे कर्मचारी प्रत्येक शाळांत जाऊन अर्ज भरून घेऊन शाळेतच पास वाटप करीत आहेत."- एतिश कटरे, आगार व्यवस्थापक, गोंदिया
"विद्यालयातच पास उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांना पासकरिता तासनतास प्रतीक्षा करावी लागणार नाही."- चंद्रहास गोडघाटे, प्राचार्य, तंत्रनिकेतन गोंदिया