लोकमत न्यूज नेटवर्कगोठणगाव : येथील वॉर्ड क्र. १ मधील रहिवासी मनोहर वारकू टेकाम यांच्या घराला आग लागून घरातील संपूर्ण साहित्य जळून राख झाले. ही घटना शनिवारी (दि.२६) रात्रीच्या सुमारास घडली. यामुळे टेकाम यांच्यावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. गोठणगाव रहिवासी मनोहर वारकू टेकाम यांच्या घराला शनिवारी रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने काही क्षणांतच संपूर्ण घर जळून राख झाले. गावकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून राख झाल्याने टेकाम यांच्या कुटुंबियांवर मोठे आर्थिक संकट ओढावले असून, उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. घरात अठराविश्वे दारिद्र्य. २५ एप्रिल रोजी ठरलेले मुलीचे लग्न, लग्नासाठी कापड, अन्नधान्याची खरेदी करून ठेवलेली. घराच्या मध्यभागातील खोल्या मातीने लिपल्याने सामान व कपडे समोरच्या पडवीत ठेवले होते. संपूर्ण कुटुंब रोज पहाटेला मोहफूल वेचायला जायचे म्हणून रात्रीच्या जेवणानंतर भांडे, कुंडे साफ करून ठेवले होते. ज्यावेळी घराला आग लावली तेव्हा संपूर्ण टेकाम कुटुंबीय घरात झोपले होते. गावकऱ्यांनी आरडाओरड केल्यानंतर संपूर्ण टेकाम कुटुंबीय बाहेर पडले. आगीचे रौद्ररूप पाहून त्यांच्या तोंडातून शब्द निघत नव्हता. सर्वच जण घराबाहेर सुखरूप निघाल्याने मोठी जीवित हानी टळली. मात्र, आगीत संपूर्ण घर आणि घरातील अन्नधान्य, कपडे आणि गृहोपयोगी साहित्य जळून राख झाल्याने टेकाम यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.
लग्नासाठी खरेदी केलेल्या कपड्यांची झाली राख - मनोहर टेकाम यांच्या मुलीचे लग्न जुळले असून, २५ एप्रिलला विवाह होणार आहे. मुलीच्या लग्नासाठी काही दिवसांपूर्वी त्यांनी कपडे, अन्नधान्य खरेदी करून ठेवले होते. मात्र, घराला लागलेल्या आगीत हे संपूर्ण जळून राख झाल्याने टेकाम कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले आहे. शासन तसेच समाजातील दानदात्यांनी टेकाम कुटुंबीयांच्या मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे.