लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येत्या शैक्षणिक वर्षापासून वह्यांच्या पानांच्या समावेशाशिवाय पुस्तके विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे वहीच्या पानांची आता खिचडी होणार नाही. पुस्तक हे पुस्तकच राहणार आहे.
पहिलीपासूनच विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचे ओझे लादले जात आहे. दप्तरात वह्या, पुस्तके, पाणी बॉटल, जेवणाचा डबा, इतर शैक्षणिक साहित्याचे ओझे असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यात ग्रामीण भागात अनेक विद्यार्थ्यांना लेखनसाहित्य उपलब्ध नसल्याचे लक्षात आले होते. त्यामुळे शासनाने २०२३-२४ च्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पाठ्यपुस्तकांतील पानांचा प्रभावी वापर होत नसल्याचे, तसेच दप्तराचे ओझे कमी होण्याऐवजी वाढत होते. येत्या शैक्षणिक वर्षापासून पूर्वीप्रमाणे पाठ्यपुस्तके असणार आहेत.
या शैक्षणिक वर्षात दिली होती पुस्तकेशैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी जिल्ह्यातील १,१४,८२५ विद्यार्थ्यांसाठी १,०६,९०० पुस्तकांची मागणी केली होती. यात वह्यांची पाने जोडलेल्या पुस्तकांचाही समावेश होता.
पुस्तकात दिली जात होती कोरी पानेपुस्तकांत पाठानंतर कोरी पाने दिली जात होती. त्यावर पाठ्यघटकांतील महत्त्वाच्या नोंदी घेणे अपेक्षित होते.
दप्तराचे वजन कमी होणारपुस्तकातील 'माझी नोंद'साठी असलेली पाने यापुढे असणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे काहीसे कमी होणार आहे.
कागद वाया नाही जाणारराज्यात दुसरी ते आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लाखांमध्ये आहे. या विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकांसोबत कोरी पाने जोडली होती. या पानांचा उपयोग होत नव्हता. मात्र, आता पुन्हा कोरी पाने पुस्कातून वगळण्यात आल्यामुळे कागद वाया जाणार नाही.
विद्यार्थ्यांचे कंबरडे मोडलेविद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी होण्याऐवजी वाढतच आहे. वह्या, जेवणाचा डबा, पुस्तके, पाणी बॉटल, आदी साहित्य घेऊन विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागत आहे.
माझी नोंद'चा फायदा नाहीपुस्तकात ही पाने 'माझी नोंद' या शीर्षकाखाली देण्यात आली होती. मात्र, या पानांचा विद्यार्थ्यांकडून फारसा वापर होत नव्हता. त्यामुळे 'माझी नोंद'चा तेवढा फायदा झाला नाही.