गोंदिया : कुष्ठरोगग्रस्त लोकांच्या मदतीबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि या आजाराने ग्रस्त लोकांची काळजी घेणाऱ्या लोकांना प्रशिक्षण देणे या उद्देशाने दरवर्षी ३० जानेवारी रोजी जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन साजरा करण्यात येतो.
३१ जानेवारी रोजी जागतिक स्तरावर हा दिन साजरा करण्यात येतो. मात्र, ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधींचा मृत्यू झाला. महात्मा गांधी यांनी कुष्ठरोग्यांची सेवा करण्यास शेकडो लोकांना प्रेरित केले, तसेच या उपक्रमासाठी स्वत: पुढाकार घेतला. त्यांचे हे महान कार्य लक्षात घेऊन १९५४ साली ख्यातनाम फ्रेंच मानवतावादी कार्यकर्ते राऔल फोलेरेऊ यांनी ३० जानेवारी या दिवसाची निवड केली. तेव्हापासून भारतात हाच दिवस कुष्ठरोग निर्मूलन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कुष्ठमुक्त गोंदियाचा संकल्प करून ३० जानेवारी पासून स्पर्श या कुष्ठ शोध मोहिमेची सुरुवात करण्यात येत आहे. घरोघरी आशा व आरोग्य कर्मचारी येऊन सर्वे करतील. त्वचेच्या चट्ट्यासाठी संदर्भ सेवा देतील तेव्हा सहकार्य करा आजार लपवू नका असे आवाहन डॉ.सुवर्णा हुबेकर यांनी केले.
‘कुष्ठरोगाला पराभूत करा, भेदभाव संपुष्टात आणा व मानसिक आरोग्यासाठी पुढाकार घ्या’ ही यंदाची २०२१ च्या या दिनाची संकल्पना आहे. रुग्णांस येणारी विद्रुपता व व्यंगत्वामुळे कुष्ठरोग एक लांच्छन असल्याचा समाजातील कित्येकांचा समज होता व अजूनही आहे. ‘बहुविधऔषधोपचार’ या आश्चर्यजनक शोधामुळे कुष्ठरुग्णांची काही लाखांमध्ये असलेली संख्या आता हजारात आली आहे. देवी रोगाप्रमाणेच कुष्ठरोग हा देखील इतिहास जमा होईल. परंतु समाजातील लोकांनी स्वतःहून तपासणीसाठी पुढे येऊन कुष्ठरोग असेल तर त्वरित औषधोपचार चालू केल्यास हे साध्य होईल.
.........
कुष्ठ रोगावरील लस विकसित
प्राप्त माहितीनुसार वर्ष २०१५ मध्ये जागतिक स्तरावर २ लाख १२ हजार लोकांना कुष्ठरोग झाला. ज्यात ६० टक्के भारतीय होते. त्यानंतर ब्राझील आणि इंडोनेशियाचा क्रमांक लागतो. नव्या बाधित प्रकरणांमध्ये ८.९ टक्के लहान मुले आणि ६.७ टक्के विकृती असलेले दिसून आले. भारतात कुष्ठरोगाच्या उपचारासाठी जगात पहिली लस विकसित करण्यात आली. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोलॉजीचे डॉ.जी.पी.तलवार यांनी ही लस विकसित केली आहे. या लसीला अमेरिकेच्या एफडीएकडूनही मान्यता मिळाली आहे. भारतातच विकसित केली गेलेली जगातील प्रथम कुष्ठरोगावरील लस मायक्रोबॅक्टीरियम इंडिकस पनी (एमआयपी) ही २०१६ साली प्रायोगिक तत्त्वावर बिहार आणि गुजरातमधील पाच जिल्ह्यांमध्ये देण्यात आली.