लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अर्वाच्च व गलिच्छ शब्दांत वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेच्या दीपाली सय्यद यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी भारतीय जनता महिला मोर्चाने केली आहे. यासाठी महिला मोर्चाच्या वतीने शहर ठाणेदार महेश बनसोडे यांना निवेदन देण्यात आले आहे. शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून २६ मे रोजी व्हिडिओद्वारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अर्वाच्च आणि गलिच्छ शब्दांत वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे देशाच्या पंतप्रधानांच्या प्रतिमेची तसेच देशाची बदनामी होत आहे. दीपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून ‘लुच्चा’ असे संबोधले आहे. आपल्या देशाचे नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधानांविषयी असे बदनामीकारक विधान करणे हा एक गंभीर स्वरूपाचा व दंडनीय गुन्हा आहे.एक राजकीय पक्ष म्हणून देशाच्या किंवा राज्याच्या प्रमुख पदांवर प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तींना शिवराळ भाषेत संबोधणे ही आपल्या देशाची संस्कृती नाही. अशा वक्तव्यांमुळे सामाजिक वातावरण बिघडून गटागटांमध्ये तेढ निर्माण होत आहे. दीपाली सय्यद यांनी केलेले वक्तव्य हे अतिशय गंभीर स्वरूपाचे असून, आपण त्यांच्यावर कारवाई न केल्यास सामाजिक स्थिती ढासळण्याची शक्यता आहे.दीपाली सय्यद यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी महिला मोर्चाने निवेदनातून केली आहे. निवेदन देताना महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम, प्रमिला सिद्रामे, नीलिमा माणिकपुरी, अंछू सरजरे, प्रीती बन्सोड, सुनीता वाघमारे, भाविका जैन व अन्य महिला उपस्थित होत्या.