गोंदिया : खरीप हंगाम सन २०१४ अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील एक लाख ९२ हजार हेक्टर क्षेत्रात विविध पिकांची पेरणी करण्यात आली. त्यासाठी शासनाकडून विविध प्रकारची खते जिल्हाभरातील कृषी केंद्रांना उपलब्ध करून देण्यात आली. मात्र गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या जिल्हा व तालुकास्तरीय भरारी पथकाच्या तपासणीत जिल्ह्यातील १४ कृषी केंद्रांमध्ये गंभीर स्वरूपाची अनियमितता आढळल्याने त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले. जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र धान पिकांचे आहे. यावर्षी एक लाख ९२ हजार हेक्टर क्षेत्रात धान पिकांसह इतर पिकांची पेरणी करण्यात आली. खंडित पावसाने आधीच शेतकऱ्यांना त्रस्त करून सोडले. त्यानंतर किडींच्या प्रादुर्भावाने त्यांना शेतकरी वैफल्यग्रस्त झाले होते. अशातच अधूनमधून येणाऱ्या पावसाने शेतकरी काही प्रमाणात सुखावला होता व शेतकऱ्यांना आता खताची गरज भासत होती. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून युरिया- २०६५१ मे.टन, डीएपी- २१७० मे.टन, एसएसपी- ८८८१ मे.टन, संयुक्त खते-१२४३० मे. टन व मिश्र खते- ११७२४ मे. टन असे एकूण ५५८५६ मे. टन खते शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करवून देण्यात आले होते. सदर रासायनिक खताचा साठा जिल्ह्यातील घाऊक व किरकोळ कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले. कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या जिल्हास्तरीय व तालुका स्तरीय भरारी पथकाने सतत केलेल्या तपासणीमध्ये काही कृषी केंद्रांमध्ये गंभीर स्वरूपाची अनियमितता आढळून आली. त्यामुळे त्यांच्यावर रासायनिक खते नियंत्रण आदेश १९८५ च्या खंड-७ नुसार तालुकानिहाय कार्यवाही करून कारणे दाखवा नोटीस देण्यात आले. मात्र या कृषी केंद्रांकडून कसल्याही प्रकारचे समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्याने कृषी विकास अधिकारी तथा परवाना अधिकारी जि.प. गोंदिया यांनी कारवाई करून या १४ कृषी केंद्रांचे परवाने तत्काळ प्रभावाने रद्द केले. रद्द करण्यात आलेल्या या कृषी केंद्रांमध्ये गोंदिया तालुक्यातील सात, गोरेगाव तालुक्यातील दोन, तिरोडा तालुक्यातील दोन, सालेकसा येथील एक, अर्जुनी/मोरगाव येथील एक व आमगाव येथील एक अशा एकूण १४ केंद्रांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील १४ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित
By admin | Updated: September 17, 2014 23:55 IST