खोटे कॅशबुक तयार करून केली स्वत:चीच फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 08:52 PM2018-04-22T20:52:56+5:302018-04-22T20:52:56+5:30

काचेवानीचे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच प्रमिला रहांगडाले व तत्कालीन ग्रामसेवक प्रणय वासनिक यांनी घडवून आणलेल्या ४.७ लाखांच्या अपहार प्रकरणातून वाचण्यासाठी खोटे कॅशबुक तयार केले.

Self-cheating fraud made by false cash book | खोटे कॅशबुक तयार करून केली स्वत:चीच फसवणूक

खोटे कॅशबुक तयार करून केली स्वत:चीच फसवणूक

Next
ठळक मुद्देसरपंच नसताना केल्या सह्या : माजी सरपंच व तत्कालीन ग्रामसेवकाचा अजब कारभार

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया-काचेवानी : काचेवानीचे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच प्रमिला रहांगडाले व तत्कालीन ग्रामसेवक प्रणय वासनिक यांनी घडवून आणलेल्या ४.७ लाखांच्या अपहार प्रकरणातून वाचण्यासाठी खोटे कॅशबुक तयार केले. पुढील काळात सरपंच दुसरे असताना सतत तीन वर्षांपर्यत सरपंच म्हणून सह्या मारल्या. तसेच ग्रामसेवकाने सरपंच नसणाऱ्या महिलेच्या सरपंच म्हणून स्वाक्षऱ्या मान्य करून दोघांनी स्वत:चीच फसवणूक करवून घेतली.
चौकशीच्या दिवशी ९ एप्रिल रोजी अपहारातील आरोपी ग्रामसेवक वासनिक यांनी सामान्य फंडाची बोगस कॅशबूक तयार करून आणली. त्यात माजी सरपंच प्रमिला रहांगडाले व तत्कालीन ग्रामसेवक वासनिक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. ही कॅशबूक १ जून २०११ ते ५ नोव्हेंबर २०१५ च्या कालावधीची तयार केली. ती बूक सध्याचे ग्रामसेवक के.टी. बाळणे यांना देवून, चार्जमध्ये दिली म्हणून स्वाक्षरी करण्यास लावण्याचा प्रयत्न केला. परंतु ते बाळणे यांनी नाकारून सरपंच एल.बी. मंडारी यांच्या सुपूर्द केले. त्या बोगस जमाखर्च रजिष्टरमध्ये (कॅशबूक) ग्रामसेवकाच्या १४९ व सरपंचाच्या १४७ स्वाक्षऱ्या दिसून येत आहेत. या बोगस कॅशबूकमुळे माजी सरपंच रहांगडाले व ग्रामसेवक वासनिक यांनी स्वत:च अपहार केल्याचे अप्रत्यक्षरित्या मान्य केल्याचे उघड होत आहे.
अपहार करण्यात आलेली ४.७० लाखांची रक्कम आली कोठून व गेली कोठे? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र बनावटी कॅशबूक तयार करून त्यांनी स्वत:च्या कर्मकांडाचा खुलासा स्वत:च करून सत्याची कबुली केली. एल.एड. कंपनीकडून ग्रामपंचायत (शासकीय) जमिनीचे भाडे १५ जुलै २०११ रोजी २५ हजार ४७७ रूपये खात्यावर जमा करण्यात आले. याच दिवशी २५ हजार रूपयांचा विड्रॉल करून मुंडीकोटा येथून लाईट खरेदी दाखविण्यात आली. १८ मार्च २०१४ रोजी या खात्यावर केवळ तीन रूपये जमा होते.
गॅमन कंपनीकडून गोडावून तयार केल्याबद्दल १९ मार्च २०१४ रोजी ९३ हजार ७५० रूपये ग्रामपंचायतला देण्यात आले होते. २१ मार्च २०१४ रोजी दोन लाख ६० हजार रूपये रंगरंगोटीकामी दाखविण्यात आले. एल.टी. कंपनीने मनोरा (टॉवर) कर म्हणून ५२ हजार ८०० रूपये ग्रामपंचायतला दिले. १५ एप्रिल २०१४ रोजी प्रदीप बडगे व मजुरांना १९ हजार रूपये, काचेवानीचे चौधरी यांना मुरूम घालण्यासाठी एक लाख ७ हजार रूपये दिल्याचे बोगस कॅशबूकमध्ये दाखविण्यात आले. १६ एप्रिल २०१४ रोजी चौधरी यांना मुरूम ट्रीपबद्दल नऊ हजार ८०० रूपये व याच दिवशी प्रदीप बडगे यांना मुरूम पसरविण्याकरिता १९ हजार रूपये दिल्याचेही बोगस कॅशबूकमध्ये सांगितले आहे. १७ एप्रिल २०१४ रोजी प्रदीप बडगे व इतरांना मजुरी म्हणून ११ हजार १३८ रूपये दिल्याचे सांगितले आहे. तसेच ३१ मे २०१४ रोजी प्रदीप बडगे व इतर यांना मजुरीचे १९ हजार रूपये दिल्याचे दाखविण्यात आले आहे.
पण वास्तविकपणे हा खाता ग्रामपंचायतला दाखविण्यात आला नाही. यात दाखविण्यात आलेले खरेदी बिले व दाखविलेली कामे खोटी असून याची चौकशी केल्यास सर्व भोंगळ कारभार उघड होईल, असे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
अपहार, फसवणूक, खोटी कॅशबूक, चुकीची कामे व मजूर दाखविणे अशा अनेक प्रकरणात माजी सरपंच प्रमिला रहांगडाले व ग्रामसेवक प्रणय वासनिक जबाबदार आहेत. तसेच माजी सरपंचाचे पतीसुद्धा सहयोगासाठी अडकण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याची माहिती संदीप अंबुले, सरपंच भंडारी, सदस्य रामला अंबुले, दिव्या भलावी व संतोष चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.
खोट्या कॅशबुकमुळे दोघेही अडकले
स्वत:चा बचाव करण्याच्या नादात खोटे कॅशबुक तयार करून आपण गुन्हेगार असल्याचा ठळक लेखी पुरावा ग्रामसेवक प्रणय वासनिक व माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच प्रमिला रहांगडाले यांनी दिला. त्यात या दोघांच्या ५ नोव्हेंबर २०१५ पर्यंत जमाखर्चावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. मात्र स्वाक्षरी करणाऱ्या माजी सरपंच केवळ २०१२ पर्यंतच सरपंच होत्या. पण त्यांनी २०१५ पर्यंत सरपंच म्हणून स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ग्रामसेवक मात्र तेच होते. ग्रामसेवक वासनिक यांनी नवीन सरपंच गायत्री चौधरी असताना माजी सरपंचाच्या सह्या कशा घेतल्या व मंजूर केल्या, असा सवाल आहे.
बँक खाते अनेक, पण कॅशबुक एकच
सामान्य फंडाचे खाते अनेक असू शकतात, मात्र कॅशबूक एकच असते. ग्रामपंचायतमध्ये सामान्य फंडाचे खाते आहे व त्याची कॅशबुकही आहे. मात्र ग्रामपंचायतमध्ये कोणताही हिशेब नसताना आठव्या वर्षी अचानक बोगस कॅशबुक तयार झाली. यात १ जून २०११ पासून ५ नोव्हेंबर २०१५ पर्यंत खाते (क्रमांक ५९४३०२०१०००५०५१) याच खात्याचा जमाखर्च आहे. सामान्य फंडाचे दोन खाते असू शकतात, पण कॅशबुक वेगळे कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
चौकशी अधिकाऱ्यांच्या सुपूर्द केले खोटी कॅशबुक
चौकशीच्या दिवशी ९ एप्रिल २०१८ रोजी सायंकाळी खोटी कॅशबूक तयार करून माजी सरपंच तथा वर्तमान उपसरपंच यांचे पती राधेश्याम रहांगडाले यांनी आणून ग्रामसेवक के.टी. बाळणे यांना देवून स्वाक्षरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र बाळणे यांनी स्पष्ट नकार देत ती बनावट कॅशबूक सरपंचांच्या सुपूर्द केली. खोटी कॅशबूक बनविल्याची माहिती चौकशी अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे यांना १० एप्रिल २०१८ रोजी देण्यात आली.
कामही नाही व मजूरही नाही
माजी सदस्य तथा तक्रारदार संदीप अंबुले यांनी सांगितले की, प्रदीप बडगे व दाखविण्यात आलेले इतर मजूर स्थानिक नाहीत. त्यांना काम करताना मी किंवा काचेवानीच्या कोणत्याही इसमाने बघितले नाही. दोन लाख ६० हजार रूपयांचे रंगरंगोटीचे काम

सुद्धा झाले नाही. मुरूमही घालण्यात आले नाही. बोगस कॅशबूकमध्ये खोटे काम दाखवून स्वत:ची फसवणूक करून घेतल्याचे ग्रामपंचायत पदाधिकाºयांचे म्हणणे आहे.

Web Title: Self-cheating fraud made by false cash book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.