गोंदिया : गावात राहत नसतानाही आपसी संबंध जोपासण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना खोटे रहिवासी प्रमाणपत्र देणाऱ्या सरपंचांवर कारवाई करण्याची मागणी जवळील ग्राम बटाणा येथील ग्रामवासीयांनी केली आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी काहीच कारवाई न केल्याने गावकऱ्यांनी थेट ग्रामविकास मंत्र्यांना निवेदन देत ग्राम पंचायतला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे. आंगणवाडी व बालवाडी कर्मचाऱ्यांना सोडून ग्राम बटाणा येथे अन्य एकही शासकीय कर्मचारी राहत नाही. असे असतानाही सरपंच लता चेतन रहांगडाले यांनी ग्राम सचिवांना गावातीलच एका महिलेच्या घरी भाड्याने राहत असल्याचे रहिवासी प्रमाणपत्र दिले. तर याबाबत माहिती अधिकारातून माहिती मागविणाऱ्या इसमास सरपंच व त्यांच्या पतीने ठार मारण्याची धमकी दिली. सरपंचांचा हा प्रकार अन्य सदस्यांच्या नकळत सुरू आहे. तर याप्रकरणी गावकऱ्यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले असूनही काहीच कारवाई करण्यात आली नाही. करिता गावकऱ्यांनी ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे निवेदन देत सरपंचांवर कारवाई करीत सचिवांना निलंबीत करण्याची मागणी केली आहे. अन्यथा ग्राम पंचायतला कुलूप ठोकण्याचा इशाराही रेवतीलाल चव्हाण, ओंकार रहांगडाले, गणेश वट्टी, अशोक कटरे, यादोराव मारबदे, हरीओम शामकुवर, मुन्ना बावनकर, प्रकाश साठवणे, रेखलाल येडे, दिनकर सोनवाने, दिपचंद शेंदरे, दुर्गेश सोनवाने व गावकऱ्यांनी निवेदनातून दिला आहे. (शहर प्रतिनिधी)
सरपंचाने दिले खोटे प्रमाणपत्र!
By admin | Updated: January 23, 2015 01:27 IST