तीन तास प्रवाशांची गैरसोय : पाणी गरम झाल्याने निघाल्या धुरासारख्या वाफाअर्जुनी-मोरगाव : गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वे मार्गावर बल्लारशहापर्यंत जाणाऱ्या रेल्वेगाडीच्या (५८८०४) इंजिनमधून (डब्ल्यूडीएम३ए-१६२४६) अचानक धूर निघाल्याने गाडीला आग लागल्याची अफवा पसरली. त्यामुळे गाडीतील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला व गाडीतून पटापट उतरण्यासाठी प्रवाशांची धावपळ सुरू झाली. परंतू इंजिनमधील पाणी संपल्यामुळे वाफ निघाल्याचे शेवटी स्पष्ट झाले.ही घटना खोडशिवणी रेल्वे फाटकाजवळील पोल (१०४० किमी) येथे घडली. यानंतर तब्बल तीन तासपर्यंत सदर रेल्वेगाडी तेथेच थांबून असल्यामुळे प्रवाशांना मोठाच मनस्ताप सहन करावा लागला. महिला व बालकांची मोठीच फजिती झाली. खाण्या-पिण्याची कोणतीही सुविधा किंवा दुकाने तिथे नव्हते. प्रवाशांना भूख व तहान सहन करीत तब्बल तीन तासपर्यंत दुसऱ्या इंजिनची वाट पाहत बसून रहावे लागले. त्यानंतर रात्री ९.१५ वाजता दुसरे इंजिन आले व गाडी खोडशिवणीवरून पुढे निघाली.ट्रेनच्या इंजिनमधून धूर निघण्याच्या कारणाबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केल्यावर त्यांनी सांगितले की, गाडीतील पाण्याचे पाईप फाटल्याने त्यामधून पाणी बाहेर निघाले. इंजिन गरम झाल्याने दोन-तीन वेळा फटफट असा आवाज झाला. यानंतर गरम पाण्याच्या वाफा धुरासारख्या इंजिनमधून निघाल्या. त्यामुळे इंजिनला आग लागल्याची बातमी वाऱ्यासारखी सर्व प्रवाशांमध्ये पसरली व सर्वांनी गाडीमधून बाहेर पडण्यासाठी एकच धावपड सुरू केली. (तालुका प्रतिनिधी)
ट्रेन जाळल्याच्या अफवेने गोंधळ
By admin | Updated: May 19, 2016 01:25 IST