गोंदिया : ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आता जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे बैठका घेऊन आढावा घेतला जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील २ व ३ जानेवारी रोजी गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. याच अनुषंगाने माजी आ. राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी रेलटोली काँग्रेस भवन येथे आढावा बैठक घेण्यात आली.
गोंदिया-भंडारा जिल्ह्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे चांगले यश मिळाले. त्यानंतर आता या दोन्ही जिल्हात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यात सुध्दा पक्षाला निश्चितच चांगले यश मिळेल, असा विश्वास माजी आ.राजेंद्र जैन यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषद निवडणूक पक्षाच्या पदाधिकारी आणि सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे दोन दिवसीय गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी त्यांच्यासमोर जिल्ह्यातील प्रलबिंत सिंचन प्रकल्पांबाबत चर्चा करून ते मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शनिवारी आयोजित बैठकीत या सर्व बाबींचा आढावा घेण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वागताच्या पूर्वतयारीला लागण्यास कार्यकर्त्यांना सांगितले. बैठकीला सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.