The rain deficiency | पावसाची तूट भरून निघेना
पावसाची तूट भरून निघेना

ठळक मुद्दे११२ मिमी पाऊस अपेक्षित : बरसला फक्त ६.७५ मिमीच

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील पर्जन्यमान बघता १७ जूनपर्यंत सरासरी ११२ मिमी पाऊस होणे अपेक्षित आहे. यंदा मात्र १७ जूनपर्यंत सरासरी ६.७५ मिमी पाऊस झाला. त्यामुळे अद्याप १०५.२५ मिमी पावसाची तूट कायम आहे. आता जून महिना अर्धा लोटला असूनही पाऊस बरसण्याचे नाव घेत नसल्याने ही तूट भरून निघणे कठीणच वाटत आहे.
पाणी टंचाई ही आता एखाद्या राज्यापुरती नव्हे तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समस्या म्हणून उभी राहत आहे. उन्हाळ््यात पाणी टंचाईची भयान वास्तवीकता दिसून येते. जिल्ह्यात आजही कित्येक गावांत पाणी टंचाईमुळे नागरिकांनी भटकंती सुरू आहे. अशात मात्र ७ जून रोजी मृग नक्षत्र लागल्याने आतातरी पाऊस बरसणार अशी जिल्हावासीय आशा बाळगून होते.
पावसाच्या प्रतीक्षेत आकाशाकडे नजरा लावून शेतकरी बसला आहे. परिणामी पाण्यासाठी सर्वांची पायपीट सुरू आहे. जिल्ह्यातील पर्जन्यमानाची स्थिती बघितल्यास १७ जूनपर्यंत सरासरी ११२ मिमी पाऊस पडणे अपेक्षीत आहे.
मात्र यंदा पावसाने पाठ फिरविल्याने १७ जून पर्यंत फक्त ६.७५ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. या वर्षाच्या तुलनेत मागील वर्षी याच कालावधीत ५२ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे.
यावरून सरासरी १०५.२५ मिमी पावसाची तूट जिल्ह्यात कायम दिसून येत आहे. असे असतानाही अद्याप दमदार पाऊस बरसलेला नसल्याने ही तूट भरून निघणे कठीणच वाटत आहे.
पावसाअभावी जिल्ह्यातील प्रकल्प,नदी, नाले तळाला लागले आहेत. परिणामी पाणी टंचाईची समस्या अद्याप कायम आहे. त्यातही आता जर दमदार पाऊस बरसला नाही तर पाणी टंचाईही समस्या अधिक गंभीर रूप घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून दमदार पावसासाठी प्रार्थना करीत आहेत.

उकाड्याने अंगाची लाहीलाही
मागील एक-दोन दिवसांपासून पावसाच्या सरी बरसून निघून जात आहेत. त्यानंतर मात्र उन्ह तापत असल्याने गार पडलेल्या वातावरणात पुन्हा उकाडा वाढतो. या उकाड्यामुळे मात्र अंगाची लाहीलाही होत आहे. आता जून महिना अर्धा लोटूनही उकाडा कमी न झाल्यामुळे कुलर व पंखे सुरूच आहेत.कधी एकदाचा दमदार पाऊस बरसण्यास सुरूवात होते याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.


Web Title: The rain deficiency
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.