खातिया : गावात शांती व सुव्यवस्था राखण्यात पोलीस पाटलांचा विशेष सहभाग असतो. सेवानिवृत्त झालेले पोलीस पाटीलही गावामध्ये शांती व सुव्यवस्था बनविण्यास पोलीस प्रशासनाची मदत करीत असतात. त्यामुळे त्यांनी स्वत:ला सेवानिवृत्त समजू नये, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक नखाते यांनी केले. केले. महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या रावणवाडी उप शाखेच्यावतीने १२ मार्च रोजी घेण्यात आलेल्या सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा मेळावा व सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी वाकचौरे, रावणवाडीचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सरपंच कुंजाम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मेश्राम व भरत दमाहे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला पाहुण्याचे हस्ते भारतमातेच्या तैलचित्राला माल्यार्पण करून दिप प्रज्वलीत करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी पोलीस पाटील कुंदा गाते यांनी स्वागत गीत प्रस्तुत केले. दरम्यान रावणवाडी ठाण्यांतर्गत येणाऱ्या ३० सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा पाहुण्यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तर उपस्थित पाहुण्यांनी पोलीस पाटलांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक आनंद तुरकर यांनी मांडले. संचालन लक्ष्मीकांत कोल्हे यांनी केले. आभार आनंद शेंडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी देवेंद्र नागपुरे, यादोराव बिसेन, महेश शहारे, विनायक राखडे, ओमप्रकाश शहारे व महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील उपशाखा रावणवाडीच्या सर्व पोलीस पाटीलांनी सहकार्य केले.(वार्ताहर)
पोलीस पाटलांनी स्वत:ला कधीही सेवानिवृत्त समजू नये
By admin | Updated: March 15, 2015 01:41 IST