आॅटोच्या प्रवासाला पसंती : दरवाढीमुळे रेल्वे प्रवासी संख्या रोडावलीबाराभाटी : रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवास भाड्यात दरवाढ केल्याने रेल्वेच्या प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. परिसरातील रेल्वे स्थानकांतून कमी अंतराचा प्रवास करणारे प्रवासी आता आॅटोच्या प्रवासाला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे आॅटोवाल्यांना सुगीचे दिवस आले असून रेल्वेचे प्रवासी रोडावत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.मानवाच्या प्राथमिक गरजाप्रमाणेच दुय्यम गरजासुद्धा अधिक महत्त्वाच्याच आहेत. मनोरंजनाची साधने, चैनीच्या वस्तू व दळणवळणाची साधने आदी बाबी महत्त्वाच्या आहेत. मनुष्य सायकल, दुचाकी, चारचाकी, एसटी बस, रेल्वे, आॅटो आदींचा वापर प्रवासासाठी करतो. पण अशातच रेल्वे विभागाने प्रवाशांच्या तिकीट भाड्यात दरवाढ केल्याने कमी अंतराचा प्रवास करणारे आता आॅटोमध्ये गर्दी करू लागले आहेत. याचा विपरित परिमाण रेल्वेच्या उत्पन्नावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वेने कर्मचारी, विद्यार्थी व इतर प्रवासी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. मात्र काही महिन्यांच्या कालावधीत रेल्वे विभागाने पाच रूपये भाड्याचे सरळ दहा रूपये दरवाढ करून रेल्वे प्रवाशांना चिंतातूर करून सोडले आहे. त्यामुळे हेच प्रवासी आता आपल्या वेळेप्रमाणे व सोयीनुसार आरामात आॅटोने प्रवास करण्याचे धाडस करीत आहेत. परिसरातील अर्जुनी-मोरगाव, नवेगावबांध व कोहमारा मार्गावर चालणाऱ्या आॅटोंमध्ये प्रवाशांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. क्षुल्लक चिल्लरच्या कारणावरून रेल्वेने प्रवाशांच्या मनावर आर्थिक ताण निर्माण केल्याचे बोलले जात आहे. मात्र वरिष्ठ पातळीवर या दरवाढीचे काय नियोजन असावे, हे रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना व रेल्वे मंत्र्यांनाच ठावूक. मात्र सामान्य प्रवाशांवर याचा मोठाच आर्थिक ताण बसत आहे. आता याचाच लाभ आॅटोवाले घेत आहेत. आॅटोचालक १० प्रवाशांऐवजी १८ ते २० प्रवाशांना कोंबून बसायला जागा नसतानाही प्रवास करायला भाग पाडत आहेत. त्यामुळे रेल्वेचा हिरवा कंदील आता आॅटो चालकांना मिळाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.रेल्वेच्या प्रवासाला सुखाचा व सुरक्षिततेचा प्रवास समजला जातो. परंतु येथे रेल्वेची दरवाढ झाल्याने रेल्वेच्या प्रवाशी संख्येमध्ये घट झाल्याचे परिसरातील रेल्वे स्थानकांच्या निरीक्षणातून दिसून येत आहे. दूरच्या अंतराचे भाडेवाढ न होता कमी अंतराची दरवाढ झाल्याने रेल्वेचे प्रवासी नाराज व्यक्त करीत आहेत. रेल्वे विभागाने दर कमी करून प्रवासाला सहकार्य करावे, असे अनेक प्रवासी बोलून दाखवित आहेत.(वार्ताहर)आॅटोचालकांना आले सुगीचे दिवसरेल्वेने कमी अंतराच्या प्रवास दरात वाढ केली. त्यामुळे अप-डाऊन करणारे कर्मचारी, किरकोळ सामान-साहित्य खरेदी विक्रीसाठी ये-जा करणारे लघु व्यावसायिक आता आॅटोने प्रवास करून आपल्या दळणवळणाच्या समस्येचा समाधान करीत आहेत. याचा लाभ आॅटोचालक करून घेत आहेत. तब्बल दुप्पट प्रवासी कोंबून नेले जात आहेत. आॅटो चालक अधिक लोभापायी क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी भरून प्रवाशांची कोंडी करीत आहेत. काळी-पिवळीमध्ये तर २० ते २२ प्रवाशांना कोंबून नेले जात आहे. या प्रकारामुळे अपघाताची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. तरी हे प्रवासी आता आॅटोच्या प्रवासालाच पसंती देताना दिसतात.
रेल्वेच्या प्रवाशांत नाराजीचा सूर
By admin | Updated: December 21, 2015 01:50 IST