लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बालाघाट येथील प्रवाशांच्या सुविधेसाठी गोंदिया-इतवारी रेल्वे गाडी बालाघाटवरुन सुरू करण्यात आली. मात्र ही गाडी गोंदिया व बालाघाट येथील प्रवाशांना चांगलीच डोकेदुखीची ठरत आहे.पूर्वी गोंदिया-इतवारी ही रेल्वे गाडी गोंदियावरुन दुपारी ३.१० मिनिटांनी सुटत होती. तर सायंकाळी ६ वाजता इतवारी स्टेशनवर पोहचत होती. त्यानंतर ही गाडी पुन्हा डोंगरगडला जात होती. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची सुध्दा सुविधा होत होती. मात्र रेल्वे विभागाने महिनाभरापूर्वीच या गाडीचा विस्तार बालाघाटपर्यंत केला. तेव्हापासून ही गाडी गोंदिया व डोंगरगड व बालाघाट येथे सुध्दा वेळेवर पोहचत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. तर या गाडीला बालाघाटपर्यंत पोहचण्यासाठी सायंकाळी ६ वाजत आहे. जेव्हा या गाडीची वेळ दुपारी ४.१५ वाजताची आहे. ही गाडी जर गोंदिया रेल्वे स्थानकावर वेळेत पोहचली तरी या गाडीला आऊटरवर बराच वेळ थांबविले जाते. या गाडीसाठी या कालावधी फलाट उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले जाते. परिणामी बालघाटवरुन येणाऱ्या प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.गोंदिया रेल्वे स्थानकावर येणाऱ्या आणि जाणाºया गाड्यांची संख्या न पाहताच रेल्वे विभागाने या गाडीचा बालाघाटपर्यंत विस्तार केल्याने त्याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे. ही गाडी जेव्हा गोंदियावरुन सुरू होती तेव्हा प्रवाशांना सहज जागा मिळत होती. मात्र या गाडीचा बालाघाटपर्यंत विस्तार केल्यापासून प्रवाशांना बºयाच अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. गोंदिया-बालाघाट मार्गावर आधीच रेल्वे गाड्यांची संख्या भरपूर होती. गोंदिया ते समनापूर सायंकाळी ५ वाजता, गोंदिया ते वाराशिवणी कटंगी २.४० वाजता आणि बालाघाट इतवारी पॅसेंजर रेल्वे गाड्या धावतात. मात्र रेल्वे विभागाने गाडीचा विस्तार केल्याने या मार्गावरील प्रवाशांना सोय होण्याऐवजी ती गैरसोयीची ठरत आहे.
रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाचा प्रवाशांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 21:57 IST