गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपला एक परिवार आहे. त्यामुळे परिवार संवाद दौऱ्याच्या माध्यमातून आपण कार्यकर्त्यांच्या भेटीला आलो असून या माध्यमातून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचे नेते खा. शरद पवार यांच्या विचारांचा पक्ष आहे. या पक्षात कार्यकर्ता हा केंद्रबिंदू मानला जातो म्हणून कार्यकर्त्यांनी पक्ष बळकटीसाठी कामाला लागण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रविवाारी गोंदिया येथे केले.
परिवार संवाद दौऱ्यानिमित्त ना. जयंत पाटील हे दोन दिवसीय गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. रविवारी त्यांनी स्थानिक नमाद महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम सभागृहात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन केले तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या जोश भरला. यावेळी मंचावर खा. प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकनकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील गवाणे, रवीकांत बर्वे, प्रवीण कोलते पाटील, आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. राजू कारेमोरे, माजी खा. मधुकर कुकडे, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी खा.खुशाल बोपचे, पंचम बिसेन, किशोर तरोणे, राजलक्ष्मी तुरकर, केतन तुरकर उपस्थित होते. ना. पाटील म्हणाले, विदर्भात आपल्या पक्षाचे आमदार कमी असले तरी सर्वच जिल्ह्यांत तळागाळापर्यंत पक्षाची पाळेमुळे आहेत. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक भक्कम करावा, असा सल्ला त्यांनी दिला तसेच जनतेच्या समस्या जाणून त्या सोडविण्याचे कार्य करावे. पक्ष सत्तेत असो वा नसो आपण नेहमी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर असले पाहिजे यामुळे त्यांच्या मनात जागा निर्माण करता येते. याच तत्त्वावर पक्ष मोठा झाला असून तो तळागळापर्यंत पोहोचला असल्याचे सांगितले. खा. प्रफुल्ल पटेल म्हणाले, कार्यकर्त्यांनी मनात कुठलाही संकोच न ठेवता जनतेच्या मदतीला नेहमीच धावून जाण्याचे कार्य करावे. केवळ निवडणुका जवळ आल्या की जनतेच्या जवळ जाण्यापेक्षा सदैव त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या अडचणी दूर करण्याचे काम करण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
......
कार्यकर्त्यांशी साधला संवाद
कार्यक्रमाला उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकनकर यांनी थेट संवाद साधला तसेच त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यांना मार्गदर्शन करुन त्यांच्यात जोश भरला त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले होते.