गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, बाधितांचे आकडे दररोज नवा रेकार्ड करीत आहे. त्यातच आता शहरीसह ग्रामीण भागात संसर्ग वेगाने वाढत आहे. काही गावच्या गाव कोरोना बाधित होत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण होत आहे, तर आरोग्य यंत्रणा सुध्दा तोकडी पडत असून एकंदरीत परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनाच आता स्वत:ची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घेण्याची गरज आहे.
जिल्ह्यात रविवारी (दि.१८) ५७६ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली, तर ७५९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर उपचार घेत असलेल्या १३ बाधितांचा मृत्यू झाला. यात खासगी रुग्णालयात ४, तर शासकीय रुग्णालयात ९ रुग्णांचा मृत्यू झाला. रविवारी आढळलेल्या ७५९ रुग्णांमध्ये सर्वाधिक ४९८ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ६०, गोरेगाव २७, आमगाव ५६, सालेकसा ७, देवरी १९, सडक अर्जुनी ७८ व बाहेरील राज्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून, ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने गावच्या गाव बाधित होत आहे. त्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट होत चालली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण सुध्दा वाढला आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या आनुषंगाने आतापर्यंत १,२२,७८० जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,०२,८६४ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत १,१५,८८६ जणांचे नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,०२,५३४ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत २५,६४० कोरोनाबाधित आढळले असून यापैकी १८,६३६ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे, तर ६,६५९ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून २,५९६ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
...................
कोरोनाबाधितांची २६ हजारांकडे वाटचाल
जिल्ह्यात आठ दिवसांच्या कालावधीत तब्बल ९ हजार कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा २५,६४० वर पोहचला असून, कोरोनाची २६ हजारी वाटचाल सुरू झाल्याचे चित्र आहे, तर १३० जणांचा मृत्यू झाला आहे. बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र रुग्ण बरे होण्याचा दर चांगला असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.
............
आरटीपीसीआर किटची समस्या कायम
गोंदिया शहरात नगर परिषदेच्या माध्यमातून पाच आरटीपीसीआर केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र या केंद्रावर आरटीपीसीआर कीटचा तुटवडा असल्याने अनेक रुग्णांना केंद्रावरून परत जावे लागत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
.......
१ लाख ३० हजार जणांना लस
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख ३० हजार जणांना कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत असल्याने लसीकरण मोहिमेत अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे लसीकरणाला ब्रेक लागत आहे.