निवडणुकीत घरोघरी जाऊन प्रचारासाठी उमेदवारासह पाच व्यक्तींनाच परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 03:44 PM2021-11-30T15:44:17+5:302021-11-30T15:53:19+5:30

जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करताना सोबत पाच व्यक्तींना नेता येणार आहे. या दरम्यान त्यांना मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील.

Only five persons, including a candidate, are allowed to go door to door election campaign | निवडणुकीत घरोघरी जाऊन प्रचारासाठी उमेदवारासह पाच व्यक्तींनाच परवानगी

निवडणुकीत घरोघरी जाऊन प्रचारासाठी उमेदवारासह पाच व्यक्तींनाच परवानगी

googlenewsNext
ठळक मुद्देजि.प. निवडणुकीत करावे लागणार कोरोना नियमांचे पालन रोड शोसाठी पाच वाहनांची मर्यादा

गोंदिया : जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायतींची निवडणूक २१ डिसेंबरला हाेणार आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट ‘ओमायक्रॉन’ आढळल्याने अलर्ट राहण्याच्या सूूचना प्रशासनाने केल्या आहेत.

कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकांदरम्यान काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. त्यांचे उमेदवारांसह राजकीय पक्षांना काटेकोरपणे पालन करावे लागणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी सोमवारी (दि. २९) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करताना सोबत पाच व्यक्तींना नेता येणार आहे. या दरम्यान त्यांना मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील. जाहीर सभा घेताना मैदानाच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के लोकांना उपस्थित राहता येणार असून, प्रत्येकाने मास्क घातलेला असावा, याची काळजी घ्यावी लागणार आहे. जास्तीत जास्त २०० लोकांना सभेला उपस्थित राहता येणार आहे.

निवडणुकीदरम्यान रोड शो करण्यासाठी केवळ पाच वाहनांचा वापर करता येणार आहे. तर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ३ वाहनांचा वापर करता येणार आहे. एकंदरीत या निवडणुकीदरम्यान कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उमेदवारासह राजकीय पक्षांनासुद्धा काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ५३, पंचायत समितीच्या १०६ आणि तीन नगर पंचायतींच्या ५१ जागांसाठी २१ डिसेंबरला निवडणूक हाेणार आहे. तर ६४ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक होत असल्याचे उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी सांगितले.

आमगाव नगर परिषदेचा कच्चा आराखडा मागवला

आमगाव नगर परिषद की नगर पंचायत यावरुन सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने अद्यापही याठिकाणी निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. पण राज्य निवडणूक विभागाने आमगाव नगर परिषदेची प्रभाग रचना निश्चित करुन त्याचा कच्चा आराखडा २ डिसेंबरपर्यंत सादर करण्यास सांगितले आहे. त्या अनुषंगाने आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी सांगितले.

फुलचूर नगर पंचायतीचा निर्णय जि. प. निवडणुकीनंतर

गोंदियालगत असलेल्या फुलचूर ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानंतर या संदर्भातील ठराव शासनाकडे पाठवला होता. मात्र, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यावर या संदर्भातील निर्णय घेण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

गोंदिया व तिरोडा नगर परिषदेत वाढणार जागा

शासनाच्या नवीन निर्णयानुसार गोंदिया नगर परिषदेतील सदस्यांची संख्या ४२वरुन ४४ होणार असून, एक प्रभाग वाढणार आहे. तर तिरोडा नगर परिषदेच्या सदस्यांची संख्या १७वरुन २० होणार आहे. येथे निवडणुका जाहीर झाल्यानंतर या नवीन सदस्य संख्येनुसार निवडणूक घेण्यात येणार आहे.

Web Title: Only five persons, including a candidate, are allowed to go door to door election campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.