कपिल केकतलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : थंडीचा जोर असतानाच अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे त्यात आणखी भर पडली असून, या बदलत्या वातावरणामुळे घराघरांत सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, त्यात आता कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला असून, ओमायक्रॉनची लक्षणेसुद्धा हीच आहेत. मात्र, सौम्य लक्षणांमुळे नागरिक आता तेवढे गांभीर्याने घेत नसून घरच्या घरीच टेस्ट करून घेत आहेत. यासाठी २५० रुपयांची कीट मेडिकल स्टोअर्समध्ये मिळत असून, त्याद्वारे नागरिक घरीच आपली टेस्ट करीत असल्याचे दिसत आहे. मात्र, या टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह निघाल्यानंतर आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे तेवढेच गरजेचे आहे. अन्यथा अशा व्यक्तींमुळेच कोरोनाचा प्रसार होतो.
काही जास्त मागणी नाहीच - मेडीकल स्टोअर्समध्ये २५० रुपयांना कोरोना टेस्ट किट मिळत असल्याचे आजही कित्येकांना माहिती नाही. शिवाय, माहिती असूनही नागरिक किट खरेदी करून टेस्ट करीत नसल्याचा प्रकार आहे. ज्यांना लांबच्या प्रवासावर जायचे आहे अशांकडूनच टेस्ट केली जात असल्याचे दिसत आहे. - त्यामुळे २५० रुपयांना किट मिळत असली, तरीही नागरिकांकडून तिची जोमात खरेदी सुरू आहे असला काहीच प्रकार सध्या तरी निदर्शनास नसल्याचे मेडीकल स्टोअर्सवाल्यांकडून कळले.
डॉक्टरांचा सल्ला घेतला का? किटमुळे नागरिकांना आता घरच्या घरीच टेस्ट करण्याची सोय झाली आहे, यात शंका नाही. मात्र, तसे करताना आरोग्य विभागाकडे त्याची नोंद पाठविणे गरजेचे आहे. याबाबत मेडीकलवाल्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. - डॉ.अमरीश मोहबे जिल्हा शल्य चिकीत्सक, गोंदिया
२५० रुपयांत किट - घरच्या घरीच कोरोनाची टेस्ट करण्यासाठी आता किट आली आहे. मेडीकल स्टोअर्समध्ये ही किट २५० रुपयांना मिळते. किट खरेदी करून घरच्या घरीच नागरिकांना कोरोना टेस्ट करता येत आहे.
पॉझिटिव्ह आल्यास नोंदणी कशी?२५० रुपयांना मिळणारी ही किट विकताना मेडीकल स्टोअर्सवाल्यांकडून संबंधित व्यक्तीचा आधारकार्ड व मोबाईल क्रमांक नोंद केला जातो. तसेच त्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास किटचा फोटो मागवून घेणे गरजेचे आहे. यानंतर संबंधित व्यक्तीची नोंद आरोग्य विभागाकडे पाठवून त्याची नोंद करविता येईल. मात्र, नागरिकांनी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरही कुणाला न सांगितल्यास हे धोक्याचे ठरणार. यामुळे मेडीकलवाल्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे.