गोंदिया शहरातील गणेशनगर येथेराहणाऱ्या सरिता पराग अग्रवाल (२८) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली; परंतु ही आत्महत्या पती व नणंदेच्या छळाला कंटाळून केली असल्याची बाब पुढे आल्याने शहर पोलिसांनी तिघांवर मृत महिलेचा भाऊ प्रवीण ऊर्फ प्रदीप गुप्ता यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
सरिता गुप्ता हिचा विवाह ७ जून २०२३ रोजी पराग रमन अग्रवाल (रा. गणेश अपार्टमेंट, गोंदिया) याच्याशी झाला होता. विवाहासाठी गुप्ता परिवाराने सोने-चांदीचे दागिने, तसेच परागची आई श्रद्धा अग्रवाल यांच्या हातात एक लाख रुपये रोख दिले होते.
लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने सुरळीत गेले. मात्र, नंतर सासू श्रद्धा अग्रवाल व नणंद पूर्वा अग्रवाल यांनी घरकाम, वागणूक, पैशांच्या मागणीवरून सरिताचा सतत मानसिक छळ सुरू केला. पती पराग अग्रवाल हा दारू पिऊन किरकोळ कारणावरून सरिताला मारहाण करीत होता. सतत शिवीगाळ, धमकी आणि अत्याचार सुरूच असल्याने सरिताने हा प्रकार फोनवर आई व भावंडांना सांगितला होता.
'ऐसा पती और सास किसी को न मिले' सोशल मीडियावर स्टेटस
सरिताने मृत्यूपूर्वी आपल्या सोशल मीडियावरून 'ऐसा पती और सास किसी को ना मिले' अशा आशयाचे स्टेटस टाकले होते. ऑगस्ट २०२४ मध्ये सरिताला मुलगी झाल्यानंतर माहेरून ३१ हजार रुपये, सोन्याचे कडे व चेन आण, म्हणून तिला तगादा लावण्यात आला होता.
गुप्ता परिवाराने क्षमतेप्रमाणे अर्धी मागणी पूर्ण केली तरीही तिचा छळ सुरूच राहिला. नणंदेच्या लग्नासाठी एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती; ५० हजार रुपये रोख सरिताच्या माहेरच्यांनी दिले होते. सतत पैशांसाठी त्रास होत असल्याने गुप्ता कुटुंबीयांनी सासूच्या खात्यात २० हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले होते. मात्र त्यानंतरही सरिताचा सासरच्या मंडळीकडून छळ सुरूच होता असे प्रथमदृष्ट्या दिसते.
पतीचे परस्त्रीसंबंध?
सरिताने आपला भाऊ योगेश गुप्ता याला सांगितले होते की, पराग अग्रवाल याचे बाहेरील महिलेबरोबर संबंध आहेत. त्यावरून वारंवार वाद होत असत. यात तिला मारहाण होत असे. हे प्रकरण एकदा भावाने जाऊन मिटविले होते; परंतु वाद सुटला नाही. अखेर ६ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे १:३० वाजेच्या सुमारास, सासू श्रद्धा अग्रवाल यांनी सरिताच्या माहेरच्या लोकांना फोन केला आणि सरिताच्या मृत्यूची बातमी दिली.
गळा आवळल्याच्या स्पष्ट खुणा, मग आत्महत्या कशी?
सरिताच्या माहेरच्या मंडळींनी घरात प्रवेश केल्यानंतर मृतदेह हॉलमध्ये, कपड्याने झाकलेला, डोक्याभोवती बांधलेला कापड, गळ्यावर दोरीने आवळल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. हे दृश्य पाहून कुटुंबीय सुन्न झाले. त्यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली. हा पती, सासू आणि नणंदेने मिळून केलेला खून असल्याचा आरोप सरिताचा भाऊ प्रवीण ऊर्फ प्रदीप गुप्त यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत केला आहे.
सरिता अग्रवाल यांच्या मृत्यू प्रकरणात पती पराग अग्रवाल, सासू श्रद्धा अग्रवाल व नणंद पूर्वा अग्रवाल यांच्याविरुद्ध हुंडाबळी, मारहाण, छळ, संशयास्पद मृत्यू कलम ८०, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
Web Summary : Sarita Agarwal, harassed by her husband, mother-in-law, and sister-in-law over dowry and infidelity, committed suicide in Gondia. Police have filed a case against the three based on the brother's complaint, alleging murder due to dowry demands and abuse.
Web Summary : गोंदिया में सरिता अग्रवाल ने दहेज और पति के विवाहेत्तर संबंध से तंग आकर आत्महत्या कर ली। पुलिस ने भाई की शिकायत पर पति, सास और ननद के खिलाफ हत्या का मामला दर्ज किया है।