The new flagship of the new flyover | नवीन उड्डाणपुलाच्या बांधकामाला हिरवी झेंडी
नवीन उड्डाणपुलाच्या बांधकामाला हिरवी झेंडी

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ८३ कोटी रुपयांचा निधी मंजूर : सर्वेक्षणासाठी मिळाला निधी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून या पुलावरुन वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा पूल पाडून या ठिकाणी नवीन उड्डाणपूल तयार करण्यात यावा. यासाठी आ.गोपालदास अग्रवाल यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.त्याला यश आले असून नवीन उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी शासनाने ८३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. विशेष म्हणजे हा मुद्दा लोकमतने सर्वप्रथम लावून धरला होता.
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना रेल्वे उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नवीन उड्डाणपूल तयार करण्यासाठी शासनाने २०१९-२० च्या अर्थसंकल्पात ८३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. नवीन उड्डाणपुलाचे बांधकामाला लवकारात लवकर सुरू करण्यासाठी त्वरीत सर्वेक्षण करण्याकरीता २ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत केला आहे. त्यामुळे गोंदिया शहरात नवीन उड्डाणपूल तयार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुन्या उड्डाणपुलाचे बांधकाम हे ८० ते ९० वर्षांपूर्वी करण्यात आले आहे. तर या पुलावरील रहदारीत सुध्दा वाढ झाली होती. त्यामुळे हा उड्डाणपूल वाहतुकीस धोकादायक असल्याचे पत्र रेल्वेने जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते.त्याचीच दखल घेत या उड्डाणपुलावरुन जडवाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. केवळ दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना या पुलावरुन प्रवेश दिला जात होता. रेल्वेने हा उड्डाणपूल सहा महिन्यात पाडून नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात यावे असे पत्र जिल्हा प्रशासनाला दिले होते. दरम्यान जुन्या जीर्ण झालेल्या उड्डाणपुलाची समस्या लक्षात घेवून आ.गोपालदास अग्रवाल यांनी हा जीर्ण उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नवीन उड्डाणपूल बांधकामाची मागणी शासनाकडे केली होती. तसेच यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्याचीच दखल शासनाने २०१९-२० च्या अर्थसंकल्पात नवीन उड्डाणपूल बांधकामासाठी ८३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे नवीन उड्डाणपूल बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. तर शहरवासीयांची समस्या सुध्दा मार्गी लागली आहे. याबद्दल आ.अग्रवाल यांचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, अ‍ॅड.के.आर.शेंडे, गोंदिया-भंडारा लोकसभा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल, शहरध्यक्ष अशोक चौधरी, चेतना पराते, दीपक नशिने, राकेश ठाकूर, गौरव वंजारी, पन्नालाल सहारे, आलोक मोहंती यांनी आभार मानले आहे.
वर्षभरात करा बांधकाम पूर्ण
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम वर्षभरात पूर्ण करा असे निर्देश आ.गोपालदास अग्रवाल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
लोकमतने वेधले सर्वप्रथम लक्ष
शहरातील जुन्या जीर्ण झालेल्या उड्डाणपुलाचा प्रश्न सर्वप्रथम लोकमतने लावून धरला होता. त्यानंतर हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी कसा धोकादायक आहे ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती. त्याचीच दखल घेत शासनाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. तसेच लोकमतने जुन्या जीर्ण उड्डाणपुलाचा मुद्दा सातत्याने लावून धरल्याने शासन आणि प्रशासनाने सुध्दा त्याची दखल घेतली हे विशेष.
जुना उड्डाणपूल पाडण्याला लवकरच सुरूवात
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल पाडण्याची प्रक्रिया निधीअभावी रखडली होती. मात्र शासनाने आता निधी मंजूर केल्याने जुना जीर्ण उड्डाणपूल पाडण्याचा मार्ग सुध्दा मोकळा झाला आहे. लवकरच जीर्ण उड्डाणपूल पाडण्यास सुरूवात केली जाणार आहे.


Web Title: The new flagship of the new flyover
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.