लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : राज्य शासनाच्या अन्न पुरवठा विभागामार्फत पुरविण्यात आलेली शिधापत्रिकेचा आवश्यक दस्तऐवज म्हणून दैनंदिन कामकाजात उपयोग केला जातो. तालुक्यातील गरजवंतांनी नव्याने शिधापत्रिका तयार केल्या. परंतु त्या गरजू शिधापत्रिकाधारकांना आजपावेतो अन्नधान्याचे वाटपच करण्यात आले नसल्याचे दिसून येत आहे. तर काही कुटुंबांकडे शिधापत्रिकाच नाहीत.तालुक्याच्या तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागामार्फत प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदारामार्फत अंत्योदय, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, बीपीएल अंतर्गत अन्न सुरक्षा योजनांतर्गत शिधापत्रिकाधारकांना तांदुळ, गहू तसेच इतर वस्तूंचा माफक दरात दर महिन्याला पुरवठा केला जातो. एकाच कुटुंबातील सदस्यांनी आपल्या कुटुंबासह वेगळ्या शिधापत्रिका नियमानुसार तयार केल्या. नव्याने शिधापत्रिका तयार करून आता कित्येक दिवस लोटले असून आज मिळेल, उद्या मिळेल या आशेवर भोळीभाबडी जनता दिवस काढत आहे. मात्र त्यांच्या नशिबी फक्त प्रतिक्षाच आहे. स्वत: रितशीर अर्ज करून नव्याने बनविलेल्या शिधापत्रिकेवर अन्नधान्याचा पुरवठा करा अशी विनंती केल्यावरही त्यांना धान्याचा पुरवठा आजघडीपर्यंत करण्यात आला नाही. असा प्रकार तहसील कार्यालयाच्या अन्न पुरवठा विभागात सुरू असल्याचे समजते.तालुक्यात असे अनेक कुटुंब स्वस्त धान्य दुकानामार्फत दिल्या जाणाऱ्या धान्यापासून वंचित असल्याची ओरड आहे. एवढेच काय तर, मागील २०-२५ वर्षांपासून गावातील रहिवाशी असूनही त्यांच्याकडे शिधापत्रिकाच नाही असेही कुटुंब तालुक्यात आहेत. परिणामी ते शासनाच्या योजनेपासून वंचित राहत असल्याचे दिसून आले. सध्या कोणत्याही विभागात शिधापत्रिकाचा पुरावा ग्राह्य धरला जातो. परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून नवीन शिधापत्रिकांचा पुरवठा होऊन शकल्याने आज त्या पुर्णत: जीर्णावस्थेत असून शेवटची घटका मोजत आहेत. गावकुसातील साधाभोळा शिधापत्रिकाधारक कार्यालयात गेला तर त्याला वारंवार चकरा माराव्या लागतात. परंतु काही दुकानदारामार्फत आले तर आर्थिक हित जपून त्यांचे विनाविलंब काम होत असल्याचीही ओरड आहे. एकंदरित अनेक शिधापत्रिकाधारक कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही स्वस्त धान्यापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे.
गरजू शिधापत्रिकाधारक धान्यपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:01 IST
तालुक्याच्या तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागामार्फत प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदारामार्फत अंत्योदय, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, बीपीएल अंतर्गत अन्न सुरक्षा योजनांतर्गत शिधापत्रिकाधारकांना तांदुळ, गहू तसेच इतर वस्तूंचा माफक दरात दर महिन्याला पुरवठा केला जातो.
गरजू शिधापत्रिकाधारक धान्यपासून वंचित
ठळक मुद्देशिधापत्रिका झाल्या जीर्ण। कित्येक कुटुंबांकडे शिधापत्रिकाच नाही