उपजिल्हाधिकारी शिंदे : १६ उपक्रमशील शिक्षकांचा गौरव समारंभ गोरेगाव : प्राचीन काळापासून गुरुचा मान-सन्मान समाजात सर्वोच्च ठिकाणी आहे. शिक्षकाने प्रत्येक कार्य निष्ठेने केले पाहिजे. जीवनात यशस्वी झालेल्या प्रत्येक व्यक्तिचा खरा शिल्पकार आई व गुरु असते, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी आर.टी. शिंदे यांनी केले. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी आयोजित शिक्षकांच्या गौरव समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी.कटरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून शास्त्र सल्लागार उपसंचालक अशोक उमरेडकर, उप शिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी, शिक्षण विस्तार अधिकारी शिरसाटे, कवयित्री उषाकिरण आत्राम, गटशिक्षणाधिकारी यशवंत कावळे, गोंडवाना दर्शनचे संपादक जुनेरसिंह ताराम, व लेखीका भुमेश्वरी खोडे उपस्थित होते. कार्यक्रमात आत्राम यांनी, शिक्षकांचे अशैक्षणिक कार्य वाहढत चालले आहे. फक्त अध्यापनाचेच कार्य शिक्षकांच्या हाती असावे. लेखन व वाचन संस्कृती शिक्षकांनी जोपासावी, अवांतर वाचन जास्त करावे असे प्रतिपादन केले. तर उमरेडकर यांनी, प्रयोग केल्याशिवाय योग होत नाही. उपक्रमशील शिक्षक कधीच शांत नसतो. सहयोगचे कार्यक्षेत्र राज्यभर वाढवावे, शालाबाह्य विद्यार्थ्यांबरोबर सहयोगाबाह्य शिक्षकांनाही या मंचात आणण्याचे आवाहन केले. कटरे यांनी, शिक्षक हा समाजाचा आरसा असतो. चारित्र्यवान व गुणसंपन्न विद्यार्थी जिल्ह्यात निर्माण व्हावेत, स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी शिक्षकही स्मार्ट असला पाहिजे. माणुसकी जोडण्याचे कार्य सहयोग द्वारा होत असल्याचे म्हटले. मोहबंशी यांनी, अप्रगत विहीत शाळा, डिजीटल शाळा निर्माण करण्याचे व विविध तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले. सहयोग शिक्षक मंचद्वारे तालुकास्तरावर आठ व केंद्रस्तरावर आठ शिक्षक विविध निकषाच्या आधारे १६ उपक्रमशील शिक्षक निवडण्यात आले. यात पी.एन. जगझापे, किशोर गर्जे, मनिषा रहांगडाले, वाय.बी. पटले, संदीप सोमवंशी, मंदा पारधी, व्ही. भाजीपाले, सुनिल हरिणखेडे यांना तालुका व कैलाश कुसराम, कुसूम भोयर, विजय नेवारे, सुभाष सोनवाने, तुरकर, अमोल खंडाईत, ज्योती बिसेन व देवेंद्र घपाडे यांना केंद्रस्तरीय उपक्रमशीला शिक्षक म्हणून स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ सन्मानित करण्यात आले. तर सोबतच फेसबुक पेज, घडिपत्रिका व हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक अध्यक्ष हेमराज शहारे यांनी मांडले. संचालन अशोक चेपटे व युवराज माने यांनी संयुक्तपणे केले. आभार उपाध्यक्ष डी.डी. रहांगडाले यांनी मानले. कार्यक्रमास नागपूर, भंडारा, गोंदिया येथील बहुशिक्षक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी प्रवर्तक रघुपती अगडे, हेमराज शहारे, युवराज माने, डी.डी. रहांगडाले, अरविंद कोटरंगे, सच्चीदानंद जीभकाटे, युवराज बडे, पुरुषोत्तम साकुरे, विजेंद्र केवट, अनिल मेश्राम, सुंदर साबळे, गोपाल बिसेन, श्रीकांत कामडी यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
आई व गुरु हेच मनुष्य जीवनाचे खरे शिल्पकार
By admin | Updated: September 12, 2015 01:40 IST