गोंदिया : मागील वर्षी जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून शाळा, महाविद्यालय बंद करण्यात आले. त्यामुळे ऑनलाईनच शिक्षण सुरु होते. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. आता २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरु होणार आहे. यासाठी शाळांचे सॅनिटायझेशन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र तब्बल दहा महिने शाळा बंद होत्या त्यामुळे मुलांनाही अभ्यासाचे टेन्शन नव्हते. आता बुधवारपासून शाळा सुरु होत असल्याने अनेक विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी नकार देत आहेत. तर काही विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी उत्सुकसुद्धा आहे. मी पहिल्याच दिवशी शाळेत जाणार नाही, सोमवारपासून नियमित शाळेत जाईन असा आग्रह विद्यार्थी आपल्या आई-वडिलांकडे धरताना दिसत आहे. आई मला शाळेत जायचं नाही असाच सूर बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये आहे. या विद्यार्थ्यांनी शाळेत न जाण्यासाठी दिलेली कारणेसुद्धा तेवढीच मजेदार आहेत. तर काही विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी उत्सुकतासुद्धा आहे. एकंदरीत होय नाहीच्या सुरात शाळांमध्ये किलबिलाट ऐकायला मिळणार आहे.
.............
पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची संख्या
इयत्ता पाचवीचे विद्यार्थी : १९७०४
इयत्ता सहावीचे विद्यार्थी : १९४४०
इयत्ता सातवीचे विद्यार्थी : १९६५०
इयत्ता आठवीचे विद्यार्थी : २०६०१
..........................................
विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
शाळा बंद असल्याने मागील दहा महिन्यांपासून ऑनलाईन शिक्षण घेत होतो. त्यामुळे शाळेत जाण्याची कसलीच कटकट नव्हती. त्यामुळे खेळायलासुद्धा भरपूर वेळ मिळत होता. आता बुधवारपासून शाळा सुरु होणार असल्याने शाळेत जाण्यासाठी कंटाळा येत आहे.
- राजू अल्लीवार, विद्यार्थी, इयत्ता पाचवी
.............................
तब्बल दहा महिन्यांनी शाळा सुरु होणार असून सर्व वर्ग मित्र पुन्हा भेटणार आहे. तर ऑनलाईन शिक्षणाचा सुद्धा कंटाळा आला होता. मात्र आता शाळा सुरु होणार असल्याने मला उत्सुकता आहे.
- कमलेश पाल, विद्यार्थी, इयत्ता सहावी
.......
शाळा जरी बंद असली तरी ऑनलाईन शिक्षण सुरु होते. मात्र जी मजा शाळेत जाऊन वर्ग मित्रांसोबत जाऊन शिक्षण घेण्यात आहे ती दुसरी कशातच नाही. त्यामुळे शाळेत जाण्याची मला उत्सुकता आहे.
- हितेंद्र रहांगडाले, विद्यार्थी, इयत्ता सातवी.
........
जी मजा शाळेत जाऊन शिक्षण घेण्यात येत होती ती ऑनलाईन शिक्षण घेण्यात मिळत नव्हती. आता दहा महिन्यानंतर शाळा सुरु होणार असल्याने मला आनंद झाला असून शाळेत जाण्याची उत्सुकता आहे.
.....
राघवेंद्र बसोने, विद्यार्थी इयत्ता आठवी
.......
विद्यार्थ्यांची कारणे ....
- आई आता एवढे दिवस शाळेत गेलो नाही, मी आठ- दहा दिवसांनी शाळेत जाईन.
- आई कोरोना अजून गेलेला नाही. माझे मित्र पण आताच शाळेत जाणार नाही असं म्हणतात, मी थोड्या दिवसांनी शाळेत जाईन.
- मी बुधवारपासून नव्हे तर सोमवारपासून शाळेत नियमित जाईन गं आई
- आई मला कंटाळा येतोय शाळेत जायचा मी ऑनलाईनच अभ्यास समजून घेईन.
.............