गोंदिया: वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी सहाय्यक प्राध्यापक मागील दोन-दोन वर्षापासून काम करीत आहेत. परंतु शासनाने त्यांना नियमित न केले नाही. त्यामुळे सेवेत नियमित करण्यात यावे या मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य वैद्यकीय संघटना २२ एप्रिलपासून संपावर जात आहेत. यात महाराष्ट्रातील ५०० सहाय्यक प्राध्यापकांचा समावेश असून त्यात गोंदियातील २५ डॉक्टर सहभागी होणार आहेत.
मागील दोन वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालयात काम करणारे कंत्राटी सहाय्यक प्राध्यापक आतापर्यंत नियमित होणे अपेक्षित होते. या संदर्भात १५ एप्रिल रोजी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या सोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये कंत्राटी सहाय्यक प्राध्यापकांनी आंदोलन मागे घेत आहोत, असे कुठेही म्हटले नाही. या कंत्राटी सहाय्यक प्राध्यापकांना नियमित करण्याचा निर्णय २२ एप्रिलपर्यंत न घेतल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य वैद्यकीय संघटनेने दिला आहे. सन २००९ व २०१६ साली विशेष बाब म्हणून समावेशन प्रक्रिया करण्यात आली. अश्या तात्पुरते प्राध्यापक व वैद्यकीय अधिकाऱ्यांना उलट १ जानेवरी २०२१ पासून सर्व नियुक्ती आदेश कंत्राटी करण्यात आले. महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय पदवीधारक डॉक्टरांना कंत्राटीचा दर्जा मिळत असेल तर हे डॉक्टरांचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र शासनाचे अपमान आहे. जेव्हा कोरोनाची दुसरी लाट आली आहे तेव्हा हीच प्रक्रिया ‘बॅक डोअर एंट्री’ म्हणून का संबोधित केले जात आहे. कोरोनाशी लढा देताना हेच तात्पुरते प्राध्यापक व वैद्यकीय अधिकारी ‘फ्रंटलाईन कोरोना वॉरियर' म्हणून संबोधित केले जातात. किंमत मात्र कोरोना बॅगर (कोरोना भिकारीची) सुद्धा केली जात नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे २५ तात्पुरते प्राध्यापक व वैद्यकीय अधिकारी आहेत. ते डॉक्टर कोरोना वाॅर्ड, टेस्टिंग लॅब, पॅथालॉजी विभाग, डेड बॉडी मॅनेजमेंट मध्ये काम करीत आहेत. या काम बंद आंदोलनामुळे कोविड व नॉन कोविड दोन्ही वैद्यकीय सुविधा होण्याची शक्यता आहे. याकडे वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी वेळीच लक्ष घालण्याची गरज आहे.