मेडिकल,बीजीडब्ल्यूत तापाचे औषध मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:24 AM2021-01-14T04:24:53+5:302021-01-14T04:24:53+5:30

गोंदिया : गोरगरीब रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, औषधांसाठी त्यांना आर्थिक भुर्दंड बसू नये यासाठी गोंदिया शासकीय महाविद्यालय, बाई ...

Medical, BGW fever medicine not found | मेडिकल,बीजीडब्ल्यूत तापाचे औषध मिळेना

मेडिकल,बीजीडब्ल्यूत तापाचे औषध मिळेना

Next

गोंदिया : गोरगरीब रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, औषधांसाठी त्यांना आर्थिक भुर्दंड बसू नये यासाठी गोंदिया शासकीय महाविद्यालय, बाई गंगाबाई महिला रुग्णालय स्थापन करण्यात आले. मात्र या दोन्ही रुग्णालयांच्या बाह्य रुग्ण तपासणी विभागामध्ये दररोज उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना येथील डॉक्टरांनीच लिहून दिलेले औषध मिळत नसून त्यांना अर्धी औषधे बाहेरून खरेदी करावी लागत आहे. साधे तापाचे औषध आणि कानात टाकण्याचे ड्राॅपसुध्दा मिळत नसल्याने रुग्णांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.

गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्यरुग्ण तपासणी विभागात दररोज ३४० आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण तपासणी विभागात ८० रुग्णांची तपासणी केली जाते. या दोन्ही ठिकाणी कार्यरत डॉक्टर रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधे लिहून देतात. त्यानंतर रुग्ण बाह्यरुग्ण तपासणी विभागात जाऊन चिठ्ठी दाखवून औषधे घेतात. काही रुग्णांना लिहून दिलेली औषधे पूर्ण मिळतात. तर काही चिठ्ठीवरील एक किंवा दोन औषधे मिळतात. तर काहींना दोन-तीन दिवसांनी औषधे येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे पुन्हा कोण येणार म्हणून गोरगरीब रुग्ण स्वत:जवळील पैसे मोजून बाहेरून औषधे खरेदी करतात. बुधवारी बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या ओपीडी आणि औषध विभागाला भेट दिली असता हे वास्तव पुढे आले. तर काही रुग्णांनी आठ दिवसांपूर्वी तर यापेक्षा विदारक स्थिती होती असे सांगितले.

......

‘भाऊ, कोणते औषध पाहिजे, बाहेर मिळेल’

काही मेडिकल विक्रेत्यांनी या दोन्ही रुग्णालयांच्या परिसरात आपली माणसे नेमून ठेवली आहेत. रुग्णालयाच्या औषध वितरण कक्षातून परतणाऱ्या रुग्णांवर त्यांची नजर असते. ते बाहेर पडणाऱ्या रुग्णांना ‘भाऊ, सर्वच औषधे मिळाले का कोणते मिळाले नाही, चला माझ्यासोबत. मी लगतच्या दुकानातून घेऊन देतो’ असे सांगून ते मेडिकलपर्यंत घेऊन जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

.....

चिठ्ठीवरील एक औषध मिळाले, दोन बाहेर घ्या

गोंदिया तालुक्यातील आसोली एक रुग्ण कानाचा आजार असल्याने बुधवारी रुग्णालयात आला होता. डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्यांना तीन प्रकारच्या गोळ्या आणि एक ड्राॅप लिहून दिले. यापैकी तीन गोळ्या मिळाल्या मात्र त्यांना कानात टाकण्याचा ड्राॅप बाहेरून घेण्यास सांगण्यात आले. त्या ड्राॅपची किंमत ९० रुपये होती. ते बाहेरून खरेदी करावे लागल्याने आर्थिक भुर्दंड बसला.

......

तापाची गोळीसुद्धा मिळेना

देवरी तालुक्यातील एक व्यक्ती त्याच्या पत्नीला ताप येत असल्याने येथे तपासणीसाठी आला होता. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना चार प्रकारच्या गोळ्या लिहून दिल्या. मात्र रुग्णालयातील औषधी केंद्रातून त्यांना केवळ एक प्रकारची गोळी मिळाली. तर उर्वरित गोळ्या न मिळल्याने त्या बाहेरून खरेदी करणार असल्याचे सांगितले.

.....

गोंदिया येथील एक रुग्णाच्या हाताला दुखापत झाली असल्याने मागील आठ दिवसांपासून तो येथे नियमित उपचारासाठी येत आहे. सुरुवातीला त्यांना डॉक्टरांनी ज्या गोळ्या लिहून दिल्या होत्या त्या मिळाल्याच नाहीत. त्यांना दोन दिवसांनी येण्यासाठी सांगितले. मात्र यानंतरही त्यांना रुग्णालयातून पूर्ण औषधे मिळाले नसल्याचे सांगितले.

.......

कोट :

रुग्णालयात पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधे घेण्यास सांगण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. तरी या अनुषंगाने आपण निश्चित चौकशी करणार.

- सागर सोनारे, अधीक्षक बीजीडब्ल्यू.

...................

ओपीडीची संख्या : ४३०

Web Title: Medical, BGW fever medicine not found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.