गोंदिया : एकीकडे वीज चोरीवर आळा घालण्यासाठी विद्युत वितरण विभाग प्रयत्न करते. परंतु दुसरीकडे या विभागाचे अभियंताच वीज चोरीला प्रोत्साहन देत असल्याचा प्रकार गोंदियात उघडकीस आला.गोंदियाच्या भीमनगर परिसरात आकडा टाकून वीज चोरी केली जात असल्यामुळे विद्युत वितरण कंपनीने त्या परिसरात केबल टाकणे सुरू केले. जवळ-जवळ तीन लाख रूपये खर्च करून केबल टाकण्याचे काम सुनिल हायटेक कंपनीला देण्यात आले. त्या कंपनीने केबल टाकण्याचे काम पुर्ण केल्यानंतर विद्युत वितरण कंपनीला केबलच्या माध्यमातून विद्युत प्रवाह सुरू करण्यास बुधवारी सांगण्यात आले. त्यानुसार विद्युत वितरण कंपनीने केबलच्या माध्यमातून विद्युत पुरवठा सुरू केला. मात्र भीमनगरात आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्यांनी या प्रकाराला घेऊन चांगलाच गोंधळ घातला. येथील ग्राहकांची एकही तक्रार नाही. मात्र विद्युत वितरण कंपनीला कवडीची मदत न करता उलट नुकसान करणाऱ्यांनी बोंबा ठोकत विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. त्यांना घाबरून अभियंता जवादे यांनी केबल मधून देण्यात येणारा विद्युत पुरवठा बंद करून पुन्हा वाहिण्यांच्या माध्यमातून विद्युत पुरवठा सुरू केला. वीज चोरीवर आळा घालण्यासाठी विद्युत विभाग वाहिन्यांवर केबल टाकते. मात्र अभियंता जवादे हे केबलचा विद्युत पुरवठा बंद करून वाहिन्यांचा पुरवठा सुरू करतात. वीज चोरीला विद्युत कंपनीचे अभियंता जवादे हे प्रोत्साहन देत असल्याचे बोलले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
महावितरणच्या अभियंत्याने वीज चोरीला प्रोत्साहन
By admin | Updated: March 15, 2015 01:38 IST