अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भाजपाने भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारासंघासाठी ऐनवेळी पक्षातील जेष्ठांना डावलून नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिल्याने भाजपातील बऱ्याच जेष्ठ नेत्यांची सुध्दा मन दुखावली आहे.गोंदिया जिल्ह्यात या उमेदवाराचा जनसंपर्कच नसल्याने मतदारांमध्ये नाराजी आहे. जेष्ठ नेत्यांना पुढे येऊन नाराजी व्यक्त करणे शक्य नाही. मात्र हे सर्व चित्र भाजपाच्या प्रचाराची धुरा साभाळणाऱ्या ‘पाच पांडवांच्या’ लक्षात आल्याने त्यांनी नाराज मनांवर मोदीरुपी फुंकर घालण्याचे औषध शोधल्याचे बोलल्या जात आहे.भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आठ सभा घेणार असून त्यात गोंदिया येथील सभेचा सुध्दा समावेश आहे. त्यामुळे मागील तीन चार दिवसांपासून भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते याची सोशल मीडिया व आणि इतर माध्यमातून जोरदार मार्केटिंग करीत आहे.या सभेच्या माध्यमातून दोन्ही जिल्ह्यातील वातावरण बदलण्याचा आणि भाजपातील नाराज मनावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपाने भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाची उमेदवारी सुनील मेंढे या नवख्या व जनसंर्पकाचा अभाव असलेल्या नेत्याला जाहीर केली. तेव्हा सर्व प्रथम याला भाजपाच्या अंतर्गत गोटातून जोरदार विरोध झाला. मात्र सध्या या दोन्ही जिल्ह्यातील भाजपा नेत्यांचे फारसे चालत नसून केवळ ‘नागपूरवरुन’ येणाऱ्यांचाच बोलबाला आहे. त्यांचाच शब्द सध्या सर्वांसाठी अंतीम मानला जात आहे.यामुळे दोन्ही जिल्ह्यातील अनुभवी आणि जेष्ठ भाजप नेत्यांमध्ये नाराजी आहे. मात्र ती उघडपणे पुढे येऊन व्यक्त करता येत नसल्याने ते सुध्दा शांत राहून हा सर्व प्रकार सहन करीत आहे. त्यामुळेच या जेष्ठ नेत्यांनी अद्यापही प्रचारात पाहिजे तसा रस घेतलेला नाही.निवडणुकीची सर्व चक्र केवळ एकाच नेत्याभोवती फिरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील भाजप नेत्यांमध्ये कुठलेही मनभेद अथवा मतभेद नसल्याचा दावा केला जात असला तरी सर्वच काही मात्र आॅलबेल नाही. तर ही नाराजी भाजपातून बंडखोरी करुन उमेदवारी दाखल केलेल्या राजेंद्र पटले यांच्या पथ्यावर सुध्दा पडू शकते अशी भाजपाच्या एका गोटात चर्चा आहे. भाजपाने या वेळेस पोवार समाजाच्या उमेदवाराला ऐनवेळी डावलल्याने या समाजात नाराजी असून ती सुध्दा मतपेटीतून उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळेच भाजपाने अंतर्गत आणि बाह्य नाराज मनावर फुंकर घालून शांत करण्यासाठी मोदी रुपी सभेचे सोल्यूशन शोधून काढल्याचे बोलल्या जाते.मोदी यांची एकतरी सभा भंडारा किंवा गोंदिया जिल्ह्यात व्हावी यासाठी पाच पांडवांनी आग्रह धरल्याची माहिती आहे. मात्र २०१४ स्थिती वेगळी आणि आताची वेगळी असल्याचे मतदारच बोलत असून मोदी रुपी फुंकर सुध्दा फारशी कामी येणार नसल्याचे बोलले जात आहे.शिवसेनेला महत्त्व किती द्यायचेलोकसभा निवडणुकीत भाजपा-सेनेची युती झाली असली तरी दोन्ही जिल्ह्यातील या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये अद्यापही सन्मवय झालेला नाही. तर स्थानिक भाजपा नेत्यांनी सुध्दा शिवसेनेला किती महत्त्व द्यायचे याची मर्यादा निश्चित केल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांना या सर्व प्रक्रियेत फारसे विश्वासात घेतले जात नसल्याचे शिवसैनिक बोलून दाखवित आहे.मात्र युतीधर्म पाळा म्हणून मातोश्रीवरुन आदेश झाल्याने ते शांत असल्याचे बोलल्या जाते.लोकसभेतील युती विधानसभेत राहणार का?वरिष्ठ पातळीवरील भाजप सेनेच्या पक्ष श्रेष्ठींनी लोकसभा निवडणुकीसाठी युतीची घोषणा केली. मात्र ही युती विधानसभेतही कायम राहणार का हे स्पष्ट झालेले नाही. गोंदिया आणि भंडारा विधानसभेच्या जागेवर शिवसेनेकडून आतापासून दावा केला जात आहे. तसे शिवसैनिक उघडपणे बोलत सुध्दा आहे. तर भाजपाच्या काही नेत्यांनी सुध्दा या दोन्ही जागावर दावा केला असून त्या दृष्टीने जनसंपर्क सुरू केला आहे. त्यामुळे लोकसभेतील युती विधानसभा निवडणुकीत कायम राहणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Lok Sabha Election 2019; नाराज मनांवर मोदीरुपी फुंकर घालण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 22:10 IST
भाजपाने भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारासंघासाठी ऐनवेळी पक्षातील जेष्ठांना डावलून नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिल्याने भाजपातील बऱ्याच जेष्ठ नेत्यांची सुध्दा मन दुखावली आहे.गोंदिया जिल्ह्यात या उमेदवाराचा जनसंपर्कच नसल्याने मतदारांमध्ये नाराजी आहे.
Lok Sabha Election 2019; नाराज मनांवर मोदीरुपी फुंकर घालण्याचा प्रयत्न
ठळक मुद्देभाजपातील अंतर्गत नाराजी बंडखोराच्या पथ्यावर : शिवसेना काठावरच