लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : तालुक्यातील कटंगी (बु.) हे गाव आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजनेंतर्गत जिल्ह्यात सुंदर गाव ठरले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) आर. एल. पुराम यांनी या गावाची प्रशंसा करत सरपंच तेजेंद्र हरिणखेडे आणि ग्रामसेवक अरविंद साखरे यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.
मागील महिन्यात या गावाची तपासणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता व पाणीपुरवठा) राजेश राठोड यांच्या समितीने केली होती. गावातील विकासकामे, शुद्ध वातावरण, स्वच्छता, गावकऱ्यांचा सामाजिक सलोखा आणि जिद्द पाहून ही समितीही मंत्रमुग्ध झाली होती. या गावाला महाराष्ट्र शासनाकडून ४० लाखांचा पुरस्कार मिळणार आहे. हे गाव सुंदर करण्यासाठी सरपंच हरीणखेडे, उपसरपंच भीमराज टेंभुर्णीकर, सदस्य प्रेमलाल भगत, सुनील भोयर, बेनिराम चौरागडे, उर्मिला हरिणखेडे, भूमेश्वरा मौजे, चंद्रकला नेवारे, वैशाली शहारे, कर्मचारी कावळे, मेघा फाये, लोमेश्वर चौरागडे आणि गावकऱ्यांनी सहकार्य केले.