येथील प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाच्या सहाव्या स्थापना दिनानिमित्त बुधवारी (दि. १) आयोजित विविध क्षेत्रातील समाजरत्नांचा सत्कार समारंभाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष अपूर्व मेठी होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विजय रहांगडाले, आमदार विनोद अग्रवाल, माजी आमदार राजेंद्र जैन, नगराध्यक्ष अशोक इंगळे, ट्रस्टचे सचिव रवी आर्य उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार रहांगडाले यांनी, नवीन तंत्रज्ञानाने माध्यमांच्या बदलत्या स्वरूपावर प्रकाश टाकला. तसेच बातम्यांची सत्यता व विश्वसनीयता टिकविण्यासाठी पत्रकारांची जबाबदारी वाढली असल्याचे सांगितले. आमदार अग्रवाल यांनी, जिल्ह्यातील पत्रकारिता सकारात्मक मार्गाने सुरू असल्याचे सांगत जिल्ह्याच्या विकासासाठी पत्रकारांचे योगदान बहुमूल्य असल्याचे सांगितले. माजी आमदार जैन यांनी आपल्या संबोधनातून पत्रकारांच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या व त्यानंतर बदलत गेलेल्या भूमिकेबद्दल माहिती सांगितली. आजही जिल्ह्यात विकासाच्या दृष्टिकोनातून काम करीत असलेले पत्रकार व त्यांचे कार्य स्तुत्य असून त्यांचे संघर्ष व त्याग निश्चितच प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
--------------------------
सहा समाजरत्नांचा केला गौरव
यावेळी प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाचा यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार वासुदेव साधवानी यांना देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रातील सत्कारमूर्तींमध्ये सामाजिक कार्यक्षेत्रातून जुगलकिशोर अग्रवाल यांचा स्व. रणजितभाई जसानी स्मृतिप्रीत्यर्थ जिल्हा गौरव सामाजिक सेवा पुरस्कार त्यांचे पुत्र विनोद अग्रवाल यांनी स्वीकारला. प्रशासन सेवेत अप्पर जिल्हाधिकारी तथा प्रभारी मुकाअ राजेश खवले यांना स्व. रामकिशोर कटकवार स्मृतिप्रीत्यर्थ जिल्हा गौरव कर्तव्यनिष्ठ पुरस्कार देऊन सहकुटुंब गौरविण्यात आले. साहित्य क्षेत्रात शशी तिवारी यांना स्व. रामदेव जायस्वाल स्मृतिप्रीत्यर्थ साहित्यरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शिक्षण क्षेत्रात पालावरची शाळा या शैक्षणिक उपक्रम व कार्याकरिता प्रशांत बोरसे व त्यांच्या सहकाऱ्यांचा स्व. मोहनलाल चांडक स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार देऊन गौरव कण्यात आला. तर कृषी क्षेत्रातून जी. रघुपती राव यांचा स्व. फाल्गुनराव पटोले स्मृतिप्रीत्यर्थ कृषिरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
------------------------------------------
पत्रकार भवनसाठी नगराध्यक्षांना दिले पत्र
याप्रसंगी नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी, नगर परिषद गोंदिया शहरात पत्रकार भवनासाठी सकारात्मक आहे व तसा ठराव पारित केला आहे. जिल्ह्याच्या इतिहासात नवीन अध्याय लिहिण्याकरिता आम्ही पुढाकार घेत असून पत्रकारांच्या हितासाठी सदैव तयार असून सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले. त्यांनी प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाला शहरात पत्रकार भवनासाठी जमीन आरक्षित करण्यासंदर्भात नगरसेवक लोकेश यादव यांच्या उपस्थितीत पत्र दिले. यामुळे भविष्यात पत्रकार भवनचे कार्य लवकरच मार्गी लागणार असल्याचे दिसून येत आहे.