गोंदिया : कुठले राज्य, जिल्ह्यातील रस्ते हे त्या भागाच्या विकासाचा आरसा असतात. त्यामुळे रस्त्यांच्या जाळ्यांना रक्तवाहिन्या म्हटले जाते. त्यातही राष्ट्रीय महामार्ग म्हटले की, त्यांच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासाठी थोडी हिम्मतच लागते. कारण केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने रस्ता बांधकामाच्या गुणवत्तेबाबत कुठलीच तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. पण त्यांचा हा दावा कितपत खरा याबाबत थोडी शंका आहे. सहा महिन्यांपूर्वीच तयार केलेल्या नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील मासुलकसा घाटाजवळील रस्ता पहिल्याच पावसात खचला. गोंदिया-बालाघाट या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४३ ची स्लोपिंग लोकार्पणापूर्वीच खचली. ही केवळ दोनच उदाहरणे नाहीत तर अशी अनेक रस्त्यांची अवस्था आहे. या रस्त्यांचे अल्पावधीत पितळ उघडे पडल्याने हीच काय राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची गुणवत्ता? असा प्रश्न निर्माण होत आहे.
सध्या सोशल मीडियावर गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गाची स्लोपिंग खचल्याचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरू असून, जानेवारी २०२६ मध्ये त्याचे लोकार्पण केले जाणार आहे. या रस्त्याच्या गुणवत्तेवर शंका उपस्थित करण्याचे कारण नाही. पण पहिल्याच मुसळधार पावसाने या राष्ट्रीय महामार्गालगतची स्लोपिंग पूर्णपणे खचली. स्लोपिंग तयार करताना त्यात मुरुमाऐवजी विद्युत केंद्रामधील राखेचा अधिक वापर केल्याचे बोलले जाते. स्लोपिंग तयार करताना त्याखाली भिंत तयार करणे गरजचे होते. पण तसे न केल्याने पावसामुळे ही स्लोपिंग खचली. तर काही ठिकाणच्या अंडरपास पुलाला तडे गेले आहेत. याच राष्ट्रीय महामार्गालगत संबंधित बांधकाम कंपनीने तयार केलेले गोंगलई येथील बसस्थानक केव्हाही खचण्याची भीती आहे.
या ४१.२१ किमीच्या बांधकामावर ५४७ कोटी खर्च केले जाणार आहेत. पण लोकार्पणापूर्वीच स्लोपिंग खचल्याने ती दुरुस्त करण्याचा भुर्दंड संबंधित बांधकाम करणाऱ्या हरयाणा येथील कंपनीला बसला. शिवाय कंपनीवर यामुळे दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे. ही बांधकाम कंपनी केंद्रातील एका बड्या नेत्याच्या नातेवाईकाची असल्याची माहिती आहे. त्यामुळे कदाचित या प्रकाराची तेवढ्या गांभीर्याने दखल घेतली जाणार नाही. नागपूर-रायपूर या राष्ट्रीय महामार्गावरील मासुलकसा घाटाजवळ पूल व रस्ता तयार करण्याचे काम अग्रवाल ग्लोबल या बांधकाम कंपनीने केले. या कंपनीने तयार केलेला रस्ता व पुलाचे बांधकाम नेहमीच वादग्रस्त राहिले. गोंदिया जिल्ह्यात पहिल्याच झालेल्या मुसळधार पावसाने मासुलकसा घाटाजवळील रस्ता खचला तर यापूर्वी देखील पुलाची साईडिंग खचली होती. या राष्ट्रीय महामार्गावर सतत अवजड वाहनांची वाहतूक सुरु असते. अशात या रस्त्याच्या कामाची गुणवत्ता जर एवढी सुमार असेल आणि बांधकामानंतर सहा महिन्यांतच जर रस्ता खचत असेल तर या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कितपत सुरक्षित असणार, याचा विचार न केलेलाच बरा. यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत केले जाणारे दावे कितपत खरे हे विचार करण्यास भाग पाडते.
दखल घेण्याऐवजी डोळेझाककोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेल्या रस्त्यांची अल्पावधीतच दुरवस्था झाली आहे. त्यामुळे त्यावरून ये-जा करणे कठीण झाले. तर काही मार्गावर बसफेरी बंद करण्यात आली. पण याचे संबंधित विभागाला काहीच घेणे-देणे नाही. याची दखल घेऊन संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याऐवजी त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष कसे करता येईल, याची काळजी घेतली जात आहे.
जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांचे हालगोंदिया जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांचे सुद्धा पहिल्याच पावसाने पितळ उघडे पाडले आहे. गोंदिया तालुक्यातील इरीं येथे तयार करण्यात आलेला डांबरी रस्ता दुसऱ्याच दिवशी उखडला. तर तिरोडा, गोंदिया, अर्जुनी मोरगाव तालुक्यांत असे अनेक रस्ते आहेत. या रस्ता बांधकामावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. पण कामाची गुणवत्ता फारच सुमार असल्याने हा कोट्यवधी रुपयांचा निधी नेमका कुठे मुरतोय? असा प्रश्न आहे.