रावणवाडी : गाव तिथे रस्ता या संकल्पनेला घेऊन शासन स्तरावरुन रस्त्यांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला जातो. मात्र यंत्रणेकडून किंवा कंत्राटदारांकडून रस्तांचे काम थातूर-मातुर पद्धतीने करुन मोठ्या प्रमाणात निधीचा उपहार केला जातो. असाच प्रकार गोंदिया- बालाघाट राज्य मार्गावर दिसून येत आहे. या राज्य मार्गावर बऱ्याच ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले असून ते खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत. मात्र संबंधित विभाग कायमस्वरुपी उपाययोजना करीत नसल्याचे चित्र या भागात दिसून येते.गोंदिया ते बालाघाट हा मार्ग आंतरराज्यीय मार्ग असून तालुक्यातील सर्वात वर्दळीचा मार्ग म्हणून जिल्ह्यात या मार्गाची ओळख आहे. दोन मुख्य बाजारपेठेला जोडणारा हा मुख्य मार्ग असल्याने तसेच या मार्गवरुन बिरसी हवाई पट्टीला जोडले असल्यानेही या मार्गावर अनेक लहान मोठ्या वाहनांची येथे सततची वर्दळ असते. रावणवाडी येथील माजी प्राध्यापक ठाकरे यांच्या घरासमोर मागील बऱ्याच काळापासून भयावह खड्डे पडले आहेत. त्यामुळे आल्या दिवशी येथे लहान मोठे अपघात घडण्याचा नित्यक्रमच सुरू झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने मागील चार महिन्यांपुर्वी येथे डांबर गिट्टीचा लेप चढवून हजारो रुपये कंत्राटदाराला मोजले. मात्र आल्पशा काळातच तो खड्डा पुर्वी प्रमाणेच झाला असून पुन्हा तिच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात आता सार्वजनिक बांधकाम विभाग मार्गावरील खड्डे पुन्हा बुजविण्याच्या कामाला लागला आहे.सध्या त्याच खड्यांची डागडूजी करण्यात येत असल्यामुळे हे दृष्य पाहून येथील नागरिक अंंचभीत झाले आहेत. या राज्य मार्गाला बरीचशी उपमार्गे जोडली आहेत. या मार्गाच्या कडेला बहुतांश विद्यालये व महाविद्यालये असल्यामुळे अनेक विद्यार्थी सायकलने ये-जा करीत असतात. यामुळे त्यांनाही या मार्गावरुन प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरतच करणे भाग पडत असते तर कधी अपघातही होत असतात. अशा परिस्थितीत संबंधित विभाग मार्गावर मुरुमाचा लेप लाऊन प्रवाशांना कोणता संदेश देत आहेत. हा प्रकार गुंतागुंताची ठरला आहे. या ठिकाणी खड्डे पडले असल्याने मार्गावरील गिट्टी उखडून रस्ताच्या कडेला पसरली आहे. तर या खड्यांत पाणी साचत असल्याने वाहन चालकांना रस्त्याची नेमकी स्थिती उगमत नाही व त्यातूनही अपघात घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी मार्गाची झालेली डागडूजी अल्पावधितच उखडून पुन्हा त्याच ठिकाणी खड्यांची निर्मिती आली असल्यामुळे या प्रकाराची सर्वोपरी चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
राज्य मार्ग देताहेत अपघाताला आमंत्रण
By admin | Updated: September 16, 2014 23:51 IST