गोंदिया : कोरोनाच्या संसर्गामुळे विद्यार्थ्यांच्या शाळा बंद आहेत. मागील दीड वर्षापासून घरातच राहणारी बच्चे कंपनी शिक्षणापासून वंचित आहे. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आता या बालकांना ऑनलाइन शिक्षण देण्याच्या गोष्टी सरकार करीत आहे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात ॲन्ड्राईड मोबाइल असेल याचा भुर्दंड पालकांना सहन करावा लागत आहे.
कोरोनाच्या दोन लाटेमुळे विद्यार्थ्यांचे दोन सत्राचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. मुलांच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षणाचा अट्टाहास धरला जाात आहे. परंतु ऑनलाइन शिक्षणापासून गोरगरिबांची मुले वंचित राहतील. ऑनलाइन एज्युकेशनसाठी लागणारा संगणक, मोबाइल व त्यासाठी लागणारा इंटरनेटचा खर्च वाढला आहे आणि वाढतच राहणार आहे. त्यात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने याचा भुर्दंड पालकांना सहन करावा लागत आहे. कमीत कमी २५ हजार रुपयाचा भुर्दंड पालकांना सहन करावा लागत आहे. त्यातही नेटवर्क बरोबर मिळत नसल्याच्या तक्रारींमध्ये खूप वाढ झाली आहे.
..............................
मोबाइल, संगणक आणि इंटरनेट
-ऑनलाइन शिक्षणासाठी संगणक संच किंवा मोबाइल असणे आवश्यक आहे. त्यांना इंटरनेटची जोडणीदेखील आवश्यक आहे. हे साहित्य खरेदी करण्यासाठी पालकांच्या खिशाला फटका बसणार आहे.
- गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. गोंदिया जिल्ह्यात इंटरनेटचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला असला आहे. मोबाइलला कव्हरेज राहात नसल्यामुळे ऑनलाइन शिक्षणाची संकल्पना मोजक्याच विद्यार्थ्यांसाठी यशस्वी राहील, असेच दिसते.
..................................
मुलांचे होतेय नुकसान
बालवयात मुलांना शिक्षणाची गोडी लावणे आवश्यक आहे. यासाठी शाळांमधून शिक्षण देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु कोरोनाच्या संकटामुळे सरकारने ऑनलाइन शिक्षण देण्याचे ठरविले आहे. यामुळे इंटरनेटचा मुलांनी जास्त वापर केल्यास त्यांच्या विपरीत परिणाम देखील होऊ शकतात.
- डॉ. यामिनी येळणे, मानसोपचारतज्ज्ञ, गोंदिया.
......................
पालकांच्या प्रतिक्रिया
१) शिक्षण महत्त्वाचे असल्याने कोरोनाच्या काळात मुलांना ऑनलाइन शिक्षण देणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पालकांना हा भुर्दंड सहन करावाच लागेल.
- छाया शंकर नागपूर आमगाव.
२) लहान मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी बालवयापासूनच त्यांना शाळेत पाठविणे आवश्यक आहे. परंतु कोरोनामुळे दीड वर्षापासून घरात असलेल्या बालकांना आता त्यांना शिक्षण देण्यासाठी ऑनलाइन शिक्षणाची भूमिका पुढे आणली. परंतु गरीब पालकांना हे परवडणारे नाही. मुलांना सरकाने मोबाइल उपलब्ध करून द्यावे.
- नरेश बोहरे, पालक रिसामा.
....................
जिल्ह्यातील वर्गनिहाय विद्यार्थी
पहिली-१४५६५
दुसरी-१८५४२
तिसरी-२०४७६
चौथी- २०४०६
पाचवी-१९६६४
सहावी-१९४४०
सातवी-२००६३
आठवी-२०६०१
नववी- २०७७२
दहावी-२२५२२