देवानंद शहारे ल्ल गोंदियाआजचे युग तंत्रज्ञानाचे आहे. नवनवीन आविष्काराने तंत्रज्ञानात वाढच होत आहे. त्यातच मोबाईल, लँडलाईन फोन, ब्रॉडबँड तसेच इंटरनेट युझर्सच्या संख्येत वर्षागणिक कमालीची वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात ब्रॉडबँड कनेक्शनधारकांची संख्या २०० ने वाढल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.१ मे १९९९ रोजी भंडारा जिल्ह्यातून गोंदिया जिल्हा विभक्त करून नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली. मात्र दूरभाष-दूरध्वनी सेवेसाठी गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यांचा मिळून एकच विभाग कार्यरत आहे. आताही गोंदिया जिल्ह्यातील दूरध्वनी प्रक्रिया भंडारा विभागातूनच चालविली जाते. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगाव या तालुक्यातील दूरध्वनी सेवा भंडारा येथील कार्यालयातून चालते. गोंदिया जिल्ह्यात सन २०१२-१३ मध्ये बीएसएनएलच्या मोबाईल धारकांची संख्या ८५ हजार होती. त्यात सन २०१३-१४ मध्ये २० हजार युझर्सची भर पडून यावर्षी ग्राहकांची संख्या एक लाख पाच हजारावर पोहचली. एवढे ग्राहक आपल्या मोबाईलवरून इंटरनेट सेवेचा लाभही घेत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. गोंदिया जिल्ह्यात ब्रॉडबँडच्या माध्यमातून इंटरनेट सेवा घेणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मागील वर्षी दोन हजार ६०० ब्रॉडबँडच्या ग्राहकांची संख्या होती. त्यात २०० युझर्सची यंदा भर पडून ती संख्या दोन हजार ८०० पर्यंत पोहचली आहे. तसेच काही बॉडबँड धारकांची सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद असल्याचेही संबंधितांनी सांगितले आहे. गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये सद्यस्थितीत एकूण आठ हजार ७०० बीएसएनएलचे लँडलाईन धारक आहेत. मागील वर्षी ही संख्या सात हजार ५०० च्या घरात होती. त्यामुळे बीएसएनएलच्या लँडलाईन सेवेतही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
‘इंटरनेट युझर्स’च्या संख्येत कमालीची वाढ
By admin | Updated: September 17, 2014 23:55 IST