साखरीटोला : सरपंच-उपसरपंच यांच्या मानधनात वाढ करावी तसेच ग्रामपंचायत स्तरावर होणाऱ्या कामांना गती मिळावी यासारख्या व इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील सरपंच-उपसरपंच संघटनेच्या वतीने खा. नाना पटोले व आ. संजय पुराम यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन देण्यात आले. सरपंच, उपसरपंच व सदस्य विकास कामे करतांना विविध समस्यांना तोंड देतात. गावाच्या विकासात्मक कामाकरीता पंचायत समिती, जिल्हा परिषद व अन्य शासकीय कार्यालयात वारंवार जावे लागते. त्याच्यावर आर्थिक ताण पडतो. सदर कामे करतांना संघर्षाची भूमिका घ्यावी लागते. सर्वात जास्त ८० टक्के कामे ग्रामपंचायत स्तरावर करण्यात येतात. मात्र सरपंच-उपसरपंच व सदस्याच्या मानधन व उपस्थिती भत्ता फारच कमी मिळतो. त्यामुळे हा अन्याय आहे. आमदार, खासदार, जि.प.सदस्य, पंचायत समिती सदस्य, पोलीस पाटील, कोतवाल, आशा सेविका, आरोग्य मदतनीस यांच्या मानधनात वेळोवेळी वाढ करण्यात येते. मात्र ग्रा.पं.च्या लोकांना आतापर्यंत कधीही वाढ करण्यात आली नाही. शासनाने ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य कराव्या अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या मागण्यामध्ये सरपंचाचे मानधन १० हजार करावे, उपसरपंचाचे मानधन पाच हजार रुपये वाढवावे, सदस्यांना एक हजार उपस्थित भत्ता द्यावा, आमदार तसेच खासदार निधी तीन लाखावरून १० लाख रुपयापर्यंत वाढवावे, सदर निधी खर्च करण्याबाबत ई निविदेची सूट देण्यात यावी, ग्रा.पं.स्तरावर होणाऱ्या कामाचे खर्च करण्याची मंजूरी देण्यात यावी या मागण्यांचा समावेश होता. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात अध्यक्ष शशी भगत, उपाध्यक्ष दिनेश कोरे, सचिव कमल येरणे, कोषाध्यक्ष डुडेश्वर भुते, संघटक जितेंद्र रहांगडाले, संतोष तिवारी उपस्थित होते. (वार्ताहर)
सरपंच-उपसरपंचाचे मानधन वाढवा
By admin | Updated: August 28, 2016 01:08 IST