आमगाव : आमगाव-सालेकसा सीमांकनात असलेल्या वाघ नदीच्या पात्रातील लिलाव करण्यात आला. परंतु लिलावधारकाने अतिरीक्त भागातील वाळूचा उपसा सुरू केल्याने याविरुध्द ग्रामपंचायतने जिल्हाधिकारी व खनिकर्म विभागाकडे तक्रार दाखल करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यातील सालेकसा व आमगाव तालुक्यातील सिमांकनातून वाघ नदीचा प्रवाह आहे. या वाघ नदीच्या पात्रातून कोट्यवधीच्या वाळुचा उपसा करण्यात येतो. यावर्षी शासनाकडून उशिरा लिलाव झाल्याने पूर्वीच वाळूचोरांनी या नदी पात्रातील वाळूची चोरी मोठय़ा प्रमाणात केली. परंतु प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे शासनाचा महसुल बुडाला. आमगाव तालुक्यात वाघ नदी पात्रातून पिपरटोला ग्रामपंचायत अंतर्गत गट क्रमांक २४९ मधील 0.८0 आर नदीपात्रातील वाळूचा लिलाव करण्यात आला, परंतु लिलावधारकाने सीमांकनाबाहेर जाऊन अवैध उपसा करून शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलची लूट केली आहे. पिपरटोला वाळूघाटावरुन लिलावापेक्षा दोन हेक्टरमधील नदीपात्रातील वाळूचा अवैध उपसा लिलावधारकाने केला. याच नदीपात्रातून बाम्हणी नदीपात्रापर्यंत अवैधरीत्या वाळुचा उपसा मोठय़ा प्रमाणात होत आहे. परंतु प्रशासनातील अधिकार्यांनी कंत्राटदाराशी संगनमत केल्याने कारवाई थंडबस्त्यात आहे. नदीपात्रातील अवैध वाळू उपसा केल्याने पावसाळ्यात शेतकर्यांना पात्रातून येण्या-जाण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागणार आहे. उपसा करणार्यांना ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी रंगेहात पकडले. परंतु सदर लिलावधारक गावकर्यांशी मुजोरी करीत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतने ठराव संमत करून लिलावधारकाची लेखी तक्रार तहसीलदार, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे केली. सरपंच अमरलाल लिल्हारे, उपसरपंच गीता भेदे, सदस्य चैतराम देशकर, निर्मला बनकर, नमिता देशकर, पुष्पा नागपुरे यांनी ग्रामपंचायतमध्ये ठराव संमत करून अवैध लिलाव धारकाविरूध्द कारवाईची मागणी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
पिपरटोला-बाम्हणी नदी घाटावर रेतीचे अवैध उत्खनन
By admin | Updated: June 2, 2014 01:26 IST