लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोणत्याही रुग्णांचा उपचाराविना बळी जाऊ नये, या उद्देशाने शासनाने आयुष्मान भारत गोल्डन कार्ड ही योजना सुरू केली आहे. जिल्ह्यात या योजनेअंतर्गत १२ लाख ९८ हजार ६१६ उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत ७ लाख १ नागरिकांनी आयुष्मान कार्ड काढले आहे. तर अनेकांनी अद्यापही कार्ड काढले नसून त्यामुळे त्यांना मोफत उपचार कसा मिळणार? असा प्रश्न आहे.
सर्वसामान्य, तसेच आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना एखादा गंभीर आजार झाला तर त्यावरील खर्चीक उपचार परवडत नाही. त्यामुळे उपचाराविना अशा रुग्णांचा आजार बळावून मृत्यूला सामोरे जावे लागते. आयुष्मान कार्ड काढणाऱ्या नागरिकांना पाच लाखांपर्यंतचा मोफत उपचार मिळतो. आरोग्याच्या विविध उपचार सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेले 'आयुष्मान भारत गोल्डन कार्ड' काढण्यासाठी येत्या डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. आयुष्मान भारत योजना ही भारत सरकारची आरोग्य योजना आहे. या योजनेअंतर्गत सरकार लोकांना आयुष्मान भारत गोल्डन कार्ड प्रदान करते. या योजनेअंतर्गत आयुष्मान भारत गोल्डन कार्डद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक रुग्णालयात जाऊन ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळवू शकतात.
जिल्ह्यात ७ लाख नागरिकांना दिले आयुष्मान कार्डजिल्हाभरात ग्रामीण व शहरी अशा एकूण ७ लाख १ नागरिकांचे आयुष्मान कार्ड काढण्यात आले आहे. जिल्ह्यात १२ लाख ९८ हजार ६१६ उद्दिष्ट आहे.
पाच लाखांपर्यंत मोफत उपचाराची आहे सुविधाआयुष्मान कार्ड असणाऱ्या लाभार्थीना योजनेत नोंदणीकृत असलेल्या खासगी रुग्णालयात पाच लाखांपर्यंत मोफत उपचार करण्यात येतो. मोठमोठ्या आजारांवर उपचार करण्यात येतो. याची सर्वसामान्य नागरिकांना मदत होते.
कागदपत्रे काय लागतात?आयुष्मान कार्ड काढण्यासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड लागते. त्यासोबतच आधार कार्डशी मोबाइल लिंक करणे गरजेचे आहे.
कोठे काढाल कार्ड?ग्रामपंचायतीमधील आपले सरकार सेवा केंद्र, आशा वर्कर, आयुष्मान भारत योजनेशी जुळलेले रुग्णालय, यासह आता रेशन दुकानांतसुद्धा आयुष्मान भारत कार्ड काढून देण्यात येणार आहे.
काय आहे आयुष्मान कार्ड?गरीब व गरजू रेशन कार्डधारकांना मोफत उपचार देण्याच्या अनुषंगाने शासनाने आयुष्मान भारत ही योजना राबविली असून, आयुष्यमान भारत कार्ड असणाऱ्यांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतो.
१३५६ आजारांचा समावेश आयुष्यमान भारत योजनेतून १३५६ प्रकारच्या आजारांवर उपचार केले जातात. या उपचारासाठी लागणारे पैसे शासन देत असते. सर्व गंभीर आजारावरील उपचार या योजनेतून करण्यात येतात.
"प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रियेसाठी पाच लाखांपर्यंतचे विमा संरक्षण देण्यात येते. त्यासाठी आयुष्मान कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित केंद्रावरून लाभार्थीनी आयुष्मान कार्ड काढून घ्यावे. आतापर्यंत ५३ टक्के लोकांनीच हे कार्ड काढले आहे."- डॉ. जयंती पटले, जिल्हा समन्वयक, आयुष्मान भारत योजना