गोंदिया : तीन दिवसांचा कालावधी लोटूनही शासनाने धान खरेदीला मुदतवाढ दिली नसल्याने जिल्ह्यातील १ लाख २० हजार शेतकरी कोंडीत सापडले आहे. तर फेडरेशनला मुदतवाढ मिळण्याची अजूनही आशा असल्याने त्यांनी शेतकऱ्यांना वेट ॲन्ड वॉच करण्याचा सल्ला दिला आहे.
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी शासनाची एजन्सी म्हणून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ सेवा सहकारी संस्थाच्या माध्यमातून शासकीय धान केंद्रावरून खरेदी केला जातो. यंदा जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला ३९ लाख १२ हजार ७३६ क्विंटल धान खरेदी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. पण या कालावधी केवळ ३७ लाख ५० हजार क्विंटल धान खरेदी झाली. तर मुदत संपल्याने धान खरेदीचे पोर्टल बंद झाल्याने धान खरेदी प्रक्रिया ठप्प झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील ११५ धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी आलेले हजारो शेतकरी केंद्रावर धान घेऊन मुदतवाढीची प्रतीक्षा करीत असल्याचे चित्र आहे. त्याच मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने केंद्रावर उघड्यावर पडून असलेल्या धानाला अवकाळी पावसाचा फटका बसू शकतो.
खासगी व्यापाऱ्यांची होतेय चांदी
मागील तीन दिवसांपासून धान खरेदीला मुदतवाढ न मिळाल्याने धान विक्रीसाठी केंद्रावर आलेले शेतकरी निराश होऊन घरी परत जात आहेत. तर काही शेतकरी गरजेपोटी कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करीत आहे. तर खासगी व्यापारी सुध्दा या संधीचा फायदा घेत असून प्रति क्विंटल चारशे ते पाचशे कमी दराने शेतकऱ्यांकडून धानाची खरेदी करीत आहे.
नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची कोंडी
शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले होते. यासाठी जिल्ह्यातील १ लाख २० हजारावर शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यांनी खरेदी केंद्रावर धान सुध्दा नेले. पण खरेदीची मुदत संपून पोर्टल बंद झाल्याने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची सुध्दा आता कोंडी झाली आहे.
मुदतवाढीच्या हालचाली नाही
धान खरेदीला मुदतवाढ देण्यासंदर्भात अद्यापही कुठल्याच हालचाली शासकीय स्तरावर सुरू नसल्याची माहिती आहे. तर फेडरेशनला सुध्दा आता मुदतवाढ मिळू शकेल, याची आशा कमीच आहे.