मुन्नाभाई नंदागवळी
बाराभाटी : येथे अनेक वर्षांपासून रेल्वे स्थानक आहे, कोरोनाच्या प्रकोपामुळे गेल्या दहा महिन्यांपासून रेल्वे बंद आहे. यामुळे या स्टेशनची फार दुर्दशा झाली असून, याकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही. या स्टेशनची दशा आणि दिशा पार बदलूनच गेल्या असल्याने रेल्वे प्रशासनाला हॅलो, मी बाराभाटी रेल्वे स्टेशन बोलतोय, अशी आर्त हाक करीत आहे.
बाराभाटी रेल्वे स्टेशन हे गोंदिया व चांदाफोर्ट या रेल्वे मार्गावर आहे. या ठिकाणाहून अनेक सामान्य नागरिक, शासकीय- निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यावसायिक, प्रशिक्षणार्थी प्रवास करीत होते, पण रेल्वे बंद असण्याच्या कारणाने पॅसेंजर दुरावली आणि प्रवासीही हरविल्याचे चित्र आहे. या स्टेशनवर रेल्वे सुरू झाली, तेव्हापासून तर आजही महिलांसाठी प्रसाधनगृह नाही, त्यामुळे त्यांची कुचंबना होते. पिण्याच्या पाण्याचे नळ नाहीत, उभे राहायला व बसायला साजेसे छत नाही, अजूनही स्टेशन परिसरात पूर्ण विद्युतीकरण नाही. मात्र, याकडे विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
-------------------
या मार्गाची पॅसेंजर सुरू करा
जवळपास एक वर्ष होत आहे पॅसेंजर बंद आहे, आम्हा सामान्यांची तरी दया करा, कोरोनामुळे हाताला काम नाही, पोटाला अन्न नाही, अशानेच आमचे जगणे हिरावले आहे. महामंडळाच्या एसटीने तर गरिबांचे तिकीट वाढविल्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे या मार्गावरील गोंदिया-चांदाफोर्ट ही पॅसेंजर गाडी सुरू करण्याची मागणी येरंडी, देवलगाव, बाराभाटी कुंभीटोला, बोळदे, कवठा, डोंगरगाव, सुकळी, खैरी, पिंपळगाव खांबी, ब्राह्मणटोला, चापटी येथील प्रवाशांनी केली आहे.