गोंदिया : नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नागझिरा आणि पिटेझरी या दोन वनपरिक्षेत्रात गुरुवारी रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात आग लागली. ही आटोक्यात आणत असताना यात होरपळून चार हंगामी वनमजुरांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेतील मृतक वनमजुरांच्या कुटुंबीयांना प्रत्येक १० लाख रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, अशी मागणी आ. परिणय फुके यांनी शासनाकडे केली आहे.
वणव्याच्या आगीत होरपळून राकेश युवराज मडावी (४०), रा. थाडेझरी, रेखचंद गोपीचंद राणे (४५), रा. धानोरी, सचिन अशोक श्रीरंगे (२७), रा. कोसमतोंडी, विजय तिजाब मरस्कोले (४०), रा. थाडेझरी या चार हंगामी वनमजुरांचा होरपळून मृत्यू झाला. तर राजू शामराव सयाम (३०), रा. बोळूंदा, हा वनमजूर गंभीर जखमी झाला. याबाबत गोंदिया जिल्हा भाजपचे महामंत्री हर्ष मोदी, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विलास बागडकर व गौरव बावनकर यांनी आ. डॉ. परिणय फुके यांना माहिती दिले. यानंतर आ. फुके यांनी लगेच व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी रामानुज यांच्याशी संपर्क साधून घटनेबाबत माहिती जाणून घेतली व मृत मजुरांच्या वारसांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत देण्याची, घरातील एका वारसाला नोकरी देण्याची व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानुषंगाने व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी यांनी वरील मागणीसंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडे चर्चा केली. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५ लाख रुपयांची मदत व आगीत जखमी वनमजुरांच्या उपचाराचा खर्चही शासन करणार असल्याचे त्यांनी सांगितले; परंतु ही रक्कम फार कमी असल्याचे सांगत वनविभागाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत करावी अन्यथा वेगळ्या पर्यायाचा विचार करावा लागेल, असा इशारा आ. फुके यांनी अधिकाऱ्यांना दिला. वनविभागाने आणखी ५ लाख रुपयांची वाढवून देण्याचे आश्वासन दिले. कुटुंबातील एका वारसाला नोकरी देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. आगीच्या घटनेमध्ये मृत्यू व जखमी झालेल्या कुटुंबासोबत आपण असून शासनाकडे उर्वरित मागण्यांबाबत पाठपुरावा करू, असे आ. फुके यांनी सांगितले.