कारवाईची मागणी : बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर भुर्दंड सुकडी-डाकराम : रोहणी नक्षत्राची चाहुल लागताच शेतकरी भर उन्हात शेतामध्ये खरीप पिकाच्या लागवडीसाठी दिवसरात्र काम करतो. पोटाला चिमटा देऊन शेतामध्ये नवनधीन धानाचे पीक घ्यावे म्हणून बाजारामध्ये येणाऱ्या बियाण्यांच्या खरेदीसाठी तळमळ करतो. मात्र महागडी बियाणे खरेदी करूनही काहीच लाभ पदरी पडत नसेल तर त्या शेतकऱ्यांची काय करावे. त्यासाठी बोगस बियाण्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. विदर्भाच्या पूर्व दिशेला गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व पूर्व नागपूर या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त खपाचे बियाणे यशोदा कंपनीचे आहेत. ही नावाजलेली धान बियाणे कंपनी आहे. या कंपनीचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले. पण यावर्षी जयश्रीराम, आरपीएन व इतर तसेच आता पद्याशाली ही बियाणे खरेदी करून पेरण्यात आले. पण ते उगवलेच नाही. यशोदा कंपनीने यावर्षी बोगस बियाणे देवून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली आहे. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांची फसवणूक झाली. यशोदा कंपनीची मान्यता रद्द करण्यात यावी. घेतलेल्या बियाण्यांवर १० किलोप्रमाणे पाच हजार रूपये व एक एकरी बियाण्यांवर १० हजार रूपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी तिरोडा तालुका काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित विभागाचे अध्यक्ष एच.डी. जांभुळकर यांनी केली आहे. तिरोडा तालुक्यामध्ये अनेक कृषी केंद्र आहेत. या केंद्रांवरून सर्वच गावातील शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले. यंदा पाऊस लांबले, तरीही शेतकऱ्यांनी धान बियाणे शेतामध्ये पेरले. पण ते काही प्रमाणात उगवले व काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काही उगवलेच नाही. अशावेळी शेतकरी आज नाही तर उद्या धान उगवेल, अशा भोळ्या आशेत होते. पण एक आठवडा झाला व एक महिना लोटल्यानंतर यशोदा कंपनीचे धान उगवलेच नाही. सुकडी-डाकराम परिसरामध्ये डोंगरगाव, खडकी, बुचाटोला, बोदलकसा, रूस्तमपूर, सुकडी-डाकराम, ठाणेगाव, मेंढा, बेरडीपार, खुर्शीपार, रावणघाटा, मलपुरी, मंगेझरी, गोविंदपूर, कोडोबर्रा, इंदोरा, निमगाव, चिखली, खमारी, गराडा, मलपुरी अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये यशोदा कंपनीची बियाणे उगवलेच नाही. जयश्रीराम, आरपीएन आता पद्माशाली धानही उगवले नाही. बुचाटोला येथील शेतकरी धर्मदास जांभुळकर यांनी तिरोडा येथील कृषी केंद्रामधून पद्माशाली (सुगधतारा) धान बियाणे खरेदी केले. शेतामध्ये १० किलोच्या तीन बॅग म्हणजे ३० किलो शेतामध्ये पेरले. हे धान केवळ २५ टक्के उगवले आहेत. त्यामुळे सदर शेतकऱ्याने तिरोडा येथील कृषी केंद्रावर जावून माहिती दिली. तसेच दुसऱ्या बियाण्यांची मागणी केली. पण कृषी केंद्रसंचालकांनी दुसरे बियाणे देता येत नाही, असे सांगितले.
एकरी १० हजार नुकसान भरपाई द्या
By admin | Updated: July 15, 2016 02:07 IST