गोरेगाव / सालेकसा : तालुक्यातील काँग्रेस कमिटीच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सोमवारी मोर्चा काढून निवेदने दिली.केंद्र व राज्यातील भाजपाप्रणित सरकारच्या निवडणूकपूर्व आश्वासनांची पूर्तता न करता जनतेची दिशाभूल करून फसवणूक केली आहे, असा आरोप करून काँग्रेस कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केला.गोरेगावच्या ठाणा चौकातून सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यामध्ये काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष झामसिंग बघेले, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. नामदेव किरसान, जिल्हा महासचिव जगदिश येरोला, पी.जी. कटरे, तालुकाध्यक्ष डेमेंद्र रहांगडाले, राजेंद्र राठौड, जितेंद्र कटरे, शशीकांत भगत, मलेशाम येरोला, अरविंद फाये, ओमप्रकाश कटरे, महिला आघाडीचे तालुकाध्यक्ष ललिता फुंडे, सरपंच संजय आमदे, रामू हरिणखेडे, सी.टी. चौधरी, पेमेंद्र कटरे, विशाल शेंडे, विवेक मेंढे, संजय भगत यांच्यासह बहुसंख्य शेतकरी, बेरोजगार युवक व शेतमजूर प्रामुख्याने उपस्थित होते.मोर्चा तहसील कार्यालयात येऊन मान्यवरांनी भाजपा सरकारच्या आश्वासनांची व जनतेची फसवणूक करण्यात आली, हे आम्ही खपवून घेणार नाही, अशा घोषणा देत तहसीलदारांना कमिटीच्या वतीने आपल्या २० मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेस कमिटीच्या सर्व आघाड्यांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. सालेकसा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात संपूर्ण तालुक्यातील शेतकरी, बेरोजगार युवक, महिला, पुरूष, मजूर वर्ग हजारोच्या संख्येने सहभागी झाले. मोर्चात सहभागी झालेल्या लोकांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या. त्यामुळे तहसील कार्यालयाचे संपूर्ण परिसर दणाणले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबा कटरे, सचिव यादवलाल बनोठे, तालुकाध्यक्ष अनिल फुंडे यांच्या नेतृत्वात माजी मंत्री भरत बहेकार यांच्या निवासस्थानावरून मोर्च्याची सुरूवात झाली. त्यानंतर बस स्थानक, पंचायत समिती चौक, को-आॅपरेटिव्ह बँक चौक, फॉरेस्ट आॅफीस समोरून सरळ तहसील कार्यालयाच्या विशाल प्रांगणात धडकला. मोर्च्यात सर्व शेतकरी, महिला व पुरूष पायी चालत गेले. तसेच ट्रॅक्टरधारक शेतकऱ्यांनी आपापल्या ट्रॅक्टरव्दारे काँग्रेसचे झेंडे घेवून ट्रॅक्टरसह मोर्च्यात सहभागी झाले. मागण्यांमध्ये प्रामुख्याने धानाला ५०० रूपये बोनस, वीज बिल माफ करणे, नवीन डिमांड दर कमी करणे, मनरेगाची कामे त्वरित सुरू करणे, शेती कामे मनरेगा अंतर्गत करावे, अन्न सुरक्षा कायदा अंमलात आणावे, गॅस पुरवठा धोरण पूर्ववत करावे, केरोसिन पुरवठा कायम ठेवावे, कृषी उत्पादनाच्या हमी भावात वाढ करणे, खताच्या किमती कमी करावे, शासनाने केलेल्या घोषणा प्रामाणिकपणे पूर्ण करावे, कर्ज वसुली मोहीम थांबविणे, भूमी अधिग्रहण कायदा रद्द करावे, बेरोजगार युवकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून द्यावे आदी मागण्यांचा समावेश होता. मोर्च्यात कैलाश अग्रवाल, सचिन बहेकार, मुन्ना शर्मा, देवचंद ढेकवार, मयाराम फुंडे, खेमराज साखरे व अनेक कार्यकर्ते सहभागी होते. (तालुका प्रतिनिधी/प्रतिनिधी)
धान उत्पादकांना बोनस द्या
By admin | Updated: February 3, 2015 22:58 IST