बाम्हणी-खडकी : आजघडीला माणुसकीचा प्रत्यय देणाऱ्या घटना खूप कमी घडतात. मात्र भिक्षा मागून चरितार्थ चालविणाऱ्या एका वृद्ध महिलेल्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी वर्गणी गोळा करून विधीवत तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करून माणुसकीचा परिचय दिला.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील बाम्हणीच्या बसस्थानकावर मागील सहा ते सात वर्षापासून एक वेडसर व अनोळखी वृध्द महिला (६५) वास्तव्यास होती. ती गावातच भिक्षा मागून आपला चरितार्थ चालवित होती. हातावर मिळेल ते खायचे आणि जीवन जगायचे असा तिचा रोजचा परिपाठ सुरू असताना अचानक राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिली. सडक-अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मावळली. शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह ती राहत असलेल्या बसस्थानकावर ठेवण्यात आला. मात्र तिच्या अंत्यविधीचा प्रश्न निर्माण झाला. अशा स्थितीमध्ये गावकऱ्यांनी पदाधिकऱ्यांच्या मदतीने निधी गोळा करून रितसर अंत्यसंस्कार पार पाडले.
वर्गणीतून केला वृद्धेचा अंत्यसंस्कार
By admin | Updated: October 29, 2016 01:07 IST