गोंदिया : १२ मार्च पर्यंत राबविण्यात येत असलेल्या महिला आरोग्य अभियानांतर्गत येथील बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात दंतरोग चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २८५ रूग्णांवर उपचार करण्यात आला. उद्घाटन दंत शल्य चिकित्सक डॉ. अंशू सैनी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बाई गंगाबाई रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजीव दोडके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमरीश मोहबे, डॉ. मनीष बत्रा, दंत चिकित्सक डॉ. नाकाडे, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, प्रसूती तज्ञ डॉ. सायस केंद्रे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. सैनी यांनी, मुख हे शरिराचे प्रवेशद्वार असून दात व मुखाचे आरोग्य राखले तर कुठलाही आजार शरिरात प्रवेश करणार नाही. गर्भवती महिलांनी विशेषत: दातांची निगा राखावी व बालकांना लहानपणापासूनच दात स्वच्छ ठेवण्याची सवय लावण्यास सांगीतले. डॉ. दोडके यांनी, दंत रोग उपचार विभाग रूग्णालयात सुरू करण्यात आल्याचे सांगत डॉ. नाकाडे दररोज उपलब्ध राहणार असल्याचे सांगीतले. विशेष म्हणजे, या शिबिरात केटीएस व बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयातील सुमारे २८५ रूग्णांची तपासणी करण्यात आली. यातील १८० महिलांची सामान्य दंत तपासणी, ५० महिलांची डेंटल केरीज, २५ रूग्णांची दाढदुखी, २८ महिलांची संशयीत ओरल कँसर तर पाच महिलांची डेंटल फ्लोरोसीस तपासणी करून उपचार करण्यात आला. तर तीन अतिगंभीर मुख व दंत आजार रूग्णांना पुढील उपचारासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालयात पाठविण्यात आले. प्रास्तावीक रक्त संक्रमण अधिकारी डॉ. हुबेकर यांनी मांडले. (शहर प्रतिनिधी)
२८५ रूग्णांवर मोफत उपचार
By admin | Updated: March 8, 2015 01:16 IST