गोंदिया : नवेगावबांध - नागझिरा अभयारण्य व पिटेझरी वन परिक्षेत्रात गुरुवारी अज्ञात इसमाने आग लावली. या आगीने उग्र रुप धारण केले होते. ही आग विझवताना हंगामी चार वन मजुरांचा यात होरपळून मृत्यू झाला, तर एक मजूर गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री (दि. ८) उशिरा उघडकीस आली.
राकेश युवराज मडावी (४०, रा. थाडेझरी), रेखचंद गोपीचंद राणे (४५, रा. धानोरी), सचिन अशोक श्रीरंगे (२७, रा. कोसमतोंडी) व विजय तिजाब मरस्कोल्हे (४०, रा. थाडेझरी) अशी मृत मजुरांची, तर राजू श्यामराव सयाम (३०, रा. बोळुंदा, जि. गोंदिया) अशी गंभीर जखमी मजुरांची नावे आहेत. त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार नवेगावबांध - नागझिरा अभयारण्य व पिटेझरी वन परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ९८, ९९, १००, ९७ मध्ये गुरुवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास आग लागली. ही आग विझविण्याचे काम ५० ते ६० वन कर्मचारी व हंगामी मजूर करीत होते. सायंकाळी ६ वाजेपर्यंत आग काही प्रमाणात आटोक्यात आली. मात्र, याच दरम्यान पुन्हा हवाधुंद सुरू झाल्याने वणवा वाढला. वणवा विझवत असताना आगीने चारही बाजूने वनमजुरांना वेढा घातला. हा परिसर पहाडीवर असल्याने वनमजुरांना कुठलीच हालचाल करता आली नाही. त्यामुळे मध्यभागी पाच ते सहा मजूर अडकले. यात तीन मजुरांचा होरपळून घटनास्थळीच, तर एका मजुराचा नागपूर येथे रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. हे सर्व हंगामी वनमजूर म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे. हा सर्व घटनाक्रम गुरुवारी रात्रीपर्यंत सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, या घटनेमुळे वन मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
.......
फायर ब्लोअरचा स्फोट झाल्याची माहिती
उन्हाळ्याच्या दिवसात तेंदूपत्ता आणि मोहफूल संकलन करण्यासाठी काही नागरिक जंगलात आग लावतात. याच आगीचे रुपांतर वणव्यात होेते. दरम्यान, गुरुवारी नवेगावबांध - नागझिरा व पिटेझरी वन परिक्षेत्रात यामुळेच आग लागली. आगीने मजुरांना चारही बाजूने घेरल्याने पाचही मजूर एका झाडावर चढले. दरम्यान झाडावर चढत असताना एका मजुराकडे असलेले फायर ब्लोअर खाली पडून त्याचा स्फोट झाल्याने आगीने उग्ररुप धारण केले. यामुळे या मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यासंदर्भात वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले.
........
घटनेची माहिती देणे टाळले
नागझिरा व पिटेझरी वन परिक्षेत्रात गुरुवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास वणवा लागला. त्यानंतर वणवा विझविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. पण, यात तीन वनमजुरांचा होरपळून मृत्यू झाल्याची बाब वन व वन्यजीव विभागाने पुढे येऊ दिली नाही. त्यानंतर शुक्रवारी (दि. ९) सकाळच्या सुमारास याची माहिती दिली.
............
गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण
वनवा विझविताना तीन हंगामी वन मजुरांचा होरपळून मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर झाले. हे सर्व मजूर सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी, थाडेझरी आणि बोळुंदा येथील आहेत. या घटनेचे वृत्त गावकऱ्यांमध्ये पसरताच त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर चांगलाच संताप व्यक्त केला. या घटनेमुळे थाडेझरी आणि बोळुंदा गावावर शोककळा पसरली होती.