लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गावात दृष्यमान शाश्वत स्वच्छता ठेवण्यासाठी येत्या १ मेपासून संपूर्ण जिल्ह्यात 'कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ ठेवू' ही मोहीम राबविण्यात येणार आहे. गावातील सर्व नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपले गाव स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक करावे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या आदेशानुसार घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा व पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यासाठी कचरा कमी करणे, त्याचा पुनर्वापर करणे व त्यावर प्रक्रिया करण्याकरिता १ मे ते १५ सप्टेंबरपर्यंत एकूण १३८ दिवस ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, जिल्ह्यातील ८८६ गावांत घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ३३१७ नाडेप टाके तयार करण्यात आले आहेत. मोहिमेच्या कालावधीत गावातील नाडेप टाक्यात ओला कचरा टाकून त्यातून सेंद्रीय खताची निर्मिती केली जाणार आहे. उपक्रम राबविण्याच्या सूचना सर्व गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतीपर्यंत माहिती पाठविण्यात आली असल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांनी सांगितले.
स्वतंत्र संपर्क अधिकारी होणार नियुक्तमोहिमेच्या प्रारंभाकरिता प्रत्येक गावांसाठी तालुकास्तरीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची स्वतंत्र संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त केली जाणार आहे. तसेच गावस्तरावर केलेल्या कामांची जिल्हा व तालुकास्तरावरून पडताळणी करण्यात येणार आहे. मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्यातील गावात दृष्यमान शाश्वत स्वच्छता ठेवण्यासाठी मोहिमेबाबत गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. दरम्यान त्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली.
स्वच्छता मंत्र्याचे आवाहन'कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ ठेवू' उपक्रमात लोकप्रतीनिधींनी सहभाग घ्यावा यासाठी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आवाहनाचे पत्र जिल्ह्यातील राज्यसभा व लोकसभा खासदार, सर्व आमदार तथा गावातील सर्व सरपंचांना पाठविले आहे. संबंधित लोकप्रतिनिधींनी त्यांच्या तालुक्यातील गावात जाऊन मोहिमेचा शुभारंभकरण्याचे आवाहनही पत्रातून करण्यात आले आहे.
मोहिमेचा फायदागावांमध्ये नाडेप कपोस्टिंगचा स्वीकार वाढेल. घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा होईल. कचरा कमी करून कचऱ्याचा पुनर्वापर करण्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखता येईल.
या काळात उपक्रम१ मे ते १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत एकूण १३८ दिवस ही मोहीम चालणार आहे. १ मे रोजी शुभारंभ केल्यानंतर १० मे पर्यंत नाडेप टाक्या भरण्यात येणार आहेत. ११ मे पासून ३० ऑगस्टपर्यंत प्रक्रिया, देखभाल आणि पडताळणी करण्यात येणार आहे. तर १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या कालावधीत नाडेप टाक्यांचा उपसा केला जाणार आहे.