लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील संगणक परिचालक मागील ४ महिन्यांपासून पगाराविना काम करीत आहेत. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. यामुळे या संगणक परिचालकांत रोष व्याप्त असून लवकरच पगार न मिळाल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा संगणक परिचालक संघटनेने दिला आहे. जिल्ह्यातील ५७६ ग्रामपंचायतींमधील ५७६ संगणक परिचालक सध्या पगाराच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यामातून सन २०११ पासून संग्राम (संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र) व सध्या ‘आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत’ प्रकल्पात ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक म्हणून संगणक परिचालक डिजिटल महाराष्ट्राचे काम नियमितपणे करीत आहेत. या प्रकल्पात राज्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, ही यंत्रणा राबवण्यासाठी एकाच कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून या कंपनीकडून परिचालकांचे मानधन वेळेवर देण्यात आलेले नाही. शिवाय, ग्रामपंचायतींना लागणारी स्टेशनरी पुरविण्याचे कंत्राट देखील या कंपनीला देण्यात आले आहे. परिणामी आता पूर्ण परिस्थिती पाहता संबंधित कंपनी तुपाशी तर संगणक परिचालक उपाशी अशीच सध्याची अवस्था आहे. संगणक परिचालक ग्रामीण भागातील जनतेला रहिवासी बांधकाम परवान्यासह २९ प्रकारचे परवाने, जमा-खर्चाची नोंद, ग्रामसभा, मासिक सभेचे ऑनलाईन कामकाज, जनगणना, घरकूल सर्व्हे, प्रधानमंत्री पीकविमा योजना इत्यादी कामे करीत आहेत.
ऑक्टोबरपासून पगाराविना - संगणक परिचालकांना ऑक्टोबर महिन्यापासून पगार मिळालेला नाही. यावर संगणक परिचालक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांपर्यंत हा प्रश्न नेला होता. यावर त्यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते; मात्र काहीच झालेले नाही. वर्षाकाठी संबंधित कंपनीला १ वर्षाची सर्व ग्रामपंचायतीकडून ॲडव्हान्स रक्कम दिली जाते. तरीही आम्हाला पगार मिळालेला नसल्याने घर कसे चालवायचे अशा प्रश्न संगणक परिचालक करीत आहेत. अशात संगणक परिचालक संघटनेने गटविकास अधिकारी बोरकर व तालुका व्यवस्थापक महेश शेंडे यांना निवेदन दिले असून ३-४ दिवसांत पगार न झाल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र साखरे, तालुकाध्यक्ष रोहित पांडे व सर्व संगणक परिचालकांनी दिला आहे.