गोंदिया : शहरातील वातावरणात राहून मोठी स्वप्न रंगविणाऱ्या एका सिव्हील इंजिनिअरने प्रवासात मिळालेल्या एटीएम कार्डच्या आधारे ७३ हजार रूपये काढले. रामनगर पोलिसांनी त्याला अवघ्या ४८ तासात अटक केली. सदर आरोपी गंगाझरी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शहारवाणी येथील रहिवासी आहे.मुंबईजवळच्या ठाणे येथील रूक्मिणीप्रसाद बिल्डींगमध्ये राहणारे विजय तिमाजी आंबटकर (६५) हे वयोवृध्द गृहस्थ लग्न समारंभासाठी विदर्भ एक्स्प्रेसने नागपूरला आले होते. त्यांचे पॉकेट (पर्स) त्याच गाडीत पडले. त्यामध्ये विविध सात बँकांचे एटीएम कार्ड होते. विशेष म्हणजे त्याच पर्समध्ये सर्व बँकांच्या एटीएमचे पीन क्रमांकही नमूद होते. शहारवाणी येथील लक्ष्मीनारायण बाबूलाल चौरीवार (२३) हा तरूण नागपूरला विविध कोर्सचा करीत आहे. त्याच दिवशी तो शहारवानी येथे येण्यासाठी विदर्भ एक्सप्रेसमध्ये चढला.विदर्भ एक्स्प्रेसमध्ये लक्ष्मीनारायणचा भाऊ जयेश चौरीवार हा अटेंडंट म्हणून काम करतो. दोघेही भाऊ विदर्भ एक्सप्रेसने गोंदियाकडे येत होते. त्या गाडीत लक्ष्मीनारायणला एटीएम असलेली ती पर्स मिळाली. त्याने ती पर्स घेतली आणि गोंदियाला आल्यानंतर अटेंडंट असलेल्या भावाला घरी जाण्यास सांगून आपण नंतर येतो तू असे सांगितले. त्यानंतर लक्ष्मीनारायणने बँक आॅफ इंडियाच्या एटीएममधून ५० हजार व अग्रसेन भवनाजवळील एचडीएफसी बँकेच्या एटीएममधून २३ हजार असे एकूण ७३ हजार रूपये काढले. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनात रामनगरचे ठाणेदार किरणकुमार कबाडी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले, प्रताप दराडे, हवालदार विजय रहांगडाले, भुमेश्वर जगनाडे, कैलाश अंबुले, जागेश्वर उईके, राजू मिश्रा, ओबलाल अंबुले यांनी केली. त्याला सायंकाळी न्यायालयात हजर करण्यात आले. सिव्हील इंजिनियरींग करून नोकरीचे स्वप्न पाहणारा तरूण फुकटचे पैसे मिळविण्याच्या नादात नाहक आपले करिअर गमावून बसला. (तालुका प्रतिनिधी)‘एसएमएस अलर्ट’मुळे काढता आला चोरट्याचा मागपैसे काढल्यामुळे गोंदियाच्या एटीएममधून पैसे काढल्याचा एसएमएस आंबटकर यांना गेला. त्यांनी लगेच या प्रकरणाची तक्रार गोंदियाच्या रामनगर पोलिसांकडे केली. रामनगर पोलिसांनी या घटनेसंदर्भात माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ब)(ड) अन्वये गुन्हा दाखल केला. तपासाची चक्रे फिरविताना ठाणेदार किरणकुमार कबाडी यांनी विदर्भ एक्सप्रेसच्या सर्व अटेंडन्सची चौकशी केली. यात एक अटेंडन्स गैरहजर असल्याचे लक्षात येताच त्याच्यासंदर्भात पोलिसांना संशय बळावला. त्याच्या घराचा पत्ता घेऊन त्याच्या घरी पोहोचल्यावर अटेंडन्स जयेशचा अपघात झाला होता. पोलिसांनी त्याची चौकशी केली, परंतु हातात काहीच लागत नसल्याने ते थोडे निराश होऊन बसले. इतक्यातच त्यांनी त्याला आपली बॅग दाखविण्यास सांगितले. त्याने आपली बॅग दाखवू की आपल्या भावाची असे म्हटल्यावर पोलिसांनी दोन्ही बॅग दाखविण्यास सांगितले, अन् यातूनच या प्रकरणाचे धागेदोरे गवसले. लक्ष्मीनारायणच्या बॅगमध्ये पैसे काढल्याच्या पावत्या आढळल्या. यासंदर्भात पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविताच त्याने एटीएममधून ७३ हजार रूपये काढल्याची कबुली दिली.
इंजिनियर निघाला एटीएम चोर
By admin | Updated: February 15, 2015 01:22 IST